भोसरी पोलिस सांभाळताहेत शेळ्या

0

चोर पकडले, पण मुद्देमालाची अंगावर जबाबदारी
पिंपरी-चिंचवड : कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. एका गुन्ह्यात चोरीस गेलेल्या बकर्‍यांचा शोध भोसरी पोलिसांनी लावला आहे. मात्र न्यायालयाचा आदेश मिळेपर्यंत आता त्यांच्यावर शेळ्या हाकण्याची वेळ आली आहे. दिनकर नामा काळे (वय 78, रा. कचरा डेपोजवळ, कॅन्टोमेंट चाळ, कासारवाडी) यांच्या 11 बकर्‍या बुधवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास चोरीस गेल्या. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर भोसरी पोलिसांनी तपासाला सुरवात केली.

आषाढ महिन्यासाठी चोरी
आसपासच्या परिसरात शेळ्या चोरणार्‍या व्यक्तींबाबत माहिती घेतली असता खडकी येथील एका आरोपीबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता चार जणांनी शेळ्या चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले असून चोरलेल्या 11 बकर्‍याही हस्तगत केल्या. आषाढ महिन्यात मटणाला जादा मागणी असल्याने आरोपींनी या बकर्‍या चोरल्या. रस्त्याने जाताना बकर्‍या नजरेस पडतील या भीतीने आरोपींनी रेल्वे ट्रॅकवरून या बकर्‍या नेल्या.

बकर्‍या हस्तगत, पण…
भोसरी पोलिसांनी चोरलेल्या बकर्‍या हस्तगत करून पोलिस ठाण्यात आणल्या खर्‍या मात्र त्यांच्या खाण्या-पिण्याचे काय, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला. भोसरी पोलिस ठाण्याचे आवार मोठे असून तिथे पावसामुळे हिरवेगार गवतही उगविले आहे. यामुळे या भागात बकर्‍या चरण्यासाठी सोडून पोलिस त्यांचे राखण करीत आहेत. न्यायालयाचा आदेश येईपर्यंत चोरीचा हस्तगत केलेला हा मुद्देमाल पोलिसांना सांभाळावा लागणार असल्याने त्यांच्यावर शेळ्या सांभाळण्याची वेळ आली आहे.