मतदानाच्यादिवशी नोकरदार, कामगारांना सुट्टी

0

पिंपरी चिंचवड ः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे. 11, 18 23 29 एप्रिलला मतदान होणार आहे. तर नोकरदार, कामगारांना मतदान करता येण्यासाठी मतदानाच्या दिवशी सुटी किंवा दोन तासांची सवलत देण्यात येणार आहे, याबाबत शासनाने आदेश काढले आहेत. जनतेला मतदान करण्याचा मुलभूत हक्क देण्यात आलेला आहे. मात्र, संस्था, आस्थापना, कंपनी व्यवस्थापनाकडून सुट्टी मिळत नसल्यामुळे नोकरदारांना मतदानाला मुकावे लागते. काही ठिकाणी भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते, मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये सुटी किंवा सवलत देत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले.

सुटीऐवजी केवळ दोन, तीन तासांची सवलत…
या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणार्‍या सर्व आस्थापना, कारखाने, दुकानांमधील कर्मचारी, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापारी, औद्योगिक उपक्रम, खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी किंवा इतर आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स आदींमधील नोकरदारांना भरपगारी सुटी किंवा अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकार्‍यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील नोकरदारांना, कामगारांना मतदान करण्यासाठी सुटीऐवजी केवळ दोन, तीन तासांची सवलत देण्यात येणार आहे, याबाबत शासनाने आदेश काढले आहेत.