मद्याच्या नशेत बायको समजून सालदाराने केला शेतमालकाचा खून

0 1

वडनगरी येथील घटनेने खळबळ

जळगाव : पत्नीशी रात्री वाद झाला, यानंतर मद्यप्राशन करुन आलेला पती शांताराम पावरा याने संतापाच्या भरात बायको समजून खळ्यात झोपलेल्या शेतमालक प्रभाकर शंकर पाटील यांचा डोक्यात ट्रॅक्टरचा लोखंडी हायड्रोलीक पाटा टाकून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे चार वाजता तालुक्यातील वडनगरी येथे मंगळवारी सकाळी समोर आली आहे. संशयित सालदार फरार असून त्याच्या पत्नीसह शालकाला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


वडनगरी येथे प्रभाकर शंकर पाटील यांचे गावाबाहेर खळे आहे. पाटील शांताराम पावरा हा सालदार म्हणून कामावर असून पत्नी गीता व दोन मुलांसह खळ्यात राहतो.
मद्याच्या नशेत बायको समजून सालदाराने केला शेतमालकाचा खून 1

भांडण सोडविणार्‍या शेतमालकाच्या नातवावरही वार
सोमवारी दुपारी सालदार शांताराम हा दारुच्या नशेत असताना त्याचे पत्नीसोबत वाद सुरू झाले. रागाच्या भरात तो कोयता घेऊन पत्नीच्या मागे धावत होता. यावेळी शेतमालक पाटील यांचे नातू गजानन शिवाजी पाटील यांनी शांताराम याला आवरले. पत्नीस मारु नको असे सांगत असताना शांतारामने थेट गजानन यांच्यावर वार केले. त्याने गजानन यांच्या डोक्यात व पायावर कोयता मारला. यानंतर तो शेतातून पळुन गेला होता. मारहाणीत त्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली. दवाखान्यात आठ ते दहा टाके घालण्यात आले. शांताराम हा त्यांच्याचकडे कामाला असल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार न करता हे प्रकरण मिटवले.

भावाकडे गेल्याने गीता वाचली
सोमवारी शांताराम याने दारुच्या नशेत वाद झाल्यामुळे भितीपोटी गिता पती शांताराम याला न सांगता मुलांसह खेडी येथे राहणारा भाऊ राजू सिताराम पावरा याच्याकडे निघून गेली. पत्नी गीता तिच्या भावाकडे गेल्याबाबत शांताराम अनभिज्ञ होता. मध्यरात्री मद्यप्राशन करुन आल्यानंतर तर्रर नशेत तसेच रागात असलेल्या शांतारामने खळ्यातील फावड्याचा दांडा घेतला. खळ्यात पत्नी गीताच झोपली आहे, या समजात शांतारामने प्रत्यक्षात त्या जागी झोपलेल्या शेतमालक प्रभाकर शंकर पाटील यांच्या डोक्यात ट्रॅक्टरचा लोखंडी हायड्रोलीक पाटा टाकला. प्रकार लक्षात आल्यावर मालकाला तशाच अवस्थेत सोडून घटनास्थळाहून पसार झाला.

नातवामुळे आजोबाच्या खूनाचा प्रकार उघड
प्रभाकर शंकर पाटील हे रक्तबंबाळ अवस्थेत खळ्यात तसेच पडून होते. सकाळी 7 वाजता त्यांचा नातू शशीकांत पाटील हा नेहमीप्रमाणे दूध काढण्यासाठी गेला असता, त्याला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले प्रभाकर पाटील यांना बघितले. व तत्काळ कुटुंबियांना प्रकार कळविा. कुटुंबियांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस उपअधिक्षक डॉ.निलाभ रोहन, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत आदी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पाटील यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी शशिकांत शिवाजी पाटील (वय 36, रा.वडनगरी) यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक भागवत तपास करीत आहेत.

पत्नी व शालकाला घेतले ताब्यात
या घटनेनंतर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, वासुदेव मराठे, संजय चौधरी, ईश्वर लोखंडे, जितेंद्र पाटील, अमीर तडवी, शैलेश चव्हाण व संदीप पाटील यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर भावाकडे गेलेली शांतारामची पत्नी गिता व तिचा भाऊ राजू या दोघांना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले. शांतारामविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.