मनपातील 100 पेक्षा अधिक लेटलतिफांना शोकॉज

0

गुटखा आढल्याने 30 जणांवर दंडात्मक कारवाई

जळगाव : जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे मनपा आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. ते काल मनपात आल्यानंतर त्यांना गुटख्याने भिंती रंगलेल्या दिसून आल्या.त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान,सकाळी मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तपासणी केली असता 30 जणांच्या खिशात गुटखा आढळून आला.त्यामुळे प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली.तसेच यादरम्यान,100 पेक्षा अधिक लेटलतिफ कर्मचारी आढळून आल्याने सबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

महापौर, उपायुक्तांनी केली कारवाई

मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सकाळी सकाळी 9.50 वाजता महापौर भारती सोनवणे व उपायुक्त अजित मुठे हे अचानक येऊन उभे राहिले. आस्थापना व आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनाही कल्पना न देता त्यांनाही बोलावून घेण्यात आले. सकाळी 9.55 वाजेनंतर महापालिकेत येणार्‍या प्रत्येकाची चौकशी करण्यात आली. यात उशिरा येणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची यादी आस्थापना अधिक्षक हरीश्चद्र खडके यांनी केली. तपासणीअंती 55 तर त्यानंतर 45 पेक्षा अधिक असे एकुण 100 पेक्षा अधिक लेटलतिफ आढळून आले. त्यामुळे सबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

गुटखा आढळून आल्याने सहा हजार रुपये दंड वसूल

जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्‍वभूमिवर आणि मनपा व्यसनमुक्त करण्याच्या अनुषंगाने मनपात येणार्‍यांची तपासणी करण्यात आली. यावेळी 30 जणांच्या खिशात गुटखा,तंबाखु आढळून आल्याने प्रत्येकी 200 रुपये दंड करण्यात आला असून सहा हजार दंडाची वसुली करण्यात आली.