मनपा अधिकार्‍यांच्या कार्यपध्दतीवर ताशेरे

0

सफाई मक्तेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न;स्थायी समिती सभेत सदस्य आक्रमक

जळगाव– स्थायी समिती सभेत जबाबदार अधिकारी उपस्थित राहत नाही. अधिकारी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देवू शकत नाहीत,माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. साफसफाईबाबत मक्तेदाराची मनमानी सुरु असूनही पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. सदस्यांची बदनामी करणे अशा विविध प्रश्नांवरुन मनपा अधिकार्‍यांच्या कार्यपध्दतीवर स्थायी समिती सभेत आक्रमक झालेल्या सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले.

मनपा स्थायी समितीची सभा सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त मिनीनाथ दंडवते, मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे, लेखाधिकारी कपील पवार, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. सभेत पून्हा सफाई मक्तेदाराच्या कामावर प्रश्न चिन्ह शिवसेनेच्या सदस्यांनी उपस्थित करून अजून किती संधी मक्तेदाराला देणार. पहिल्या दिवसापासून जी तक्रार आहे ती तक्रार आजतागायत देखील आहे. त्यामुळे मक्तेदाराला अजून किती पाठिशी घालणार आहे असा सवाल नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. यावर उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांनी आयुक्त मक्तेदाराची सुनावणी घेवून येत्या महासभेत प्रशासनाची भूमिका मांडणार असल्याचे सभागृहाला सांगितले.

मनपा अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

महापालिकेत अनेक प्रकरणे प्रलंबित असून त्यातून महापालिकेतून उत्पन्न मिळू शकते. परंतू महापालिकेतील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. आपले पावने दोन कोटी रुपये उच्च न्यायालयात पडलेले असून ते मिळविण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. सदस्य विविध प्रश्न मांडून देखील अधिकारी सोडवित नाही, त्यामुळे सभापतींना रणरागणीचे रुप घेण्याची वेळ आली असल्याचे नितिन लढ्ढा यांनी निदर्शनास आणून दिले.

आयुक्त,उपायुक्तांवर सभापतींची नाराजी

स्थायी समिती सभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची माहिती जबाबदार अधिकारी देवू शकतात. परंतू अधिकारीच सभेत उपस्थित राहत नसतील तर माहिती काणाला विचारायची. दोन -तीन सभेपासून आयुक्त नाही, उपायुक्त नसतात असे म्हणत सभापती अ‍ॅड.हाडा यांनी नाराजी व्यक्त केली.तसेच आयुक्त, दोन्ही उपायुक्तांनी पुढील सभेपासून उपस्थित राहावे अशी सूचना मांडली.

अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा देखावा

अतिक्रमण विभागाकडून शहरात सर्रास हप्ते वसुली सुरू असून खोट्या कारवाई करून गरिब हॉकर्स तसेच बंद अवस्थेत एका बाजूला पडलेले साहित्य जप्त करून कारवाईचा देखावा करीत आहेत.तर दुसरीकडे रस्त्यावर अनधिकृतपणे स्टॉल लावण्याची परवागी देत असल्याचा आरोप करत नितीन बरडे यांनी अतिक्रमण अधिक्षकांना चांगलेच धारेवर धरले.

वेतनवाढीचा प्रस्ताव तहकुब

वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांचा वेतनवाढीच्या प्रस्तावावर नितीन लढ्ढा यांनी हरकत घेतली. लढ्ढा म्हणाले की, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना गैरवर्तणूक केलाच्या आरोपावरून शिक्षा दिली गेली आहे. तरी देखील प्रशासनाने आता जी भूमिका मांडली ती संशयास्पद असल्याचे म्हणाले. यावर सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी संबंधित प्रस्ताव तहकूब करून या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती घेण्याचे आश्वासन दिले.

आवश्यक देणीबाबत धोरण अपेक्षित

मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून 55 कोटी रुपये वसुल झाले असून याचे काय नियोजन केले अशी विचारणा नितीन लढ्ढा यांनी सभागृहात केली. यावर मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी पाणीपुरवठा वीज बिल देणे, शिक्षक, सेवानिवृत्तांचे वेतन आदी आवश्यक देणी अदा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.दरम्यान,धोरण ठरविण्याची उपसूचना लढ्ढा यांनी केली.