मनसेच्या नव्या झेंड्यावर शिवराजमुद्रेचा वापर नको

0

पिंपरी चिंचवड : राजकीय पक्षाच्या झेंड्यावर शिवराजमुद्रेचा वापर करणे अत्यंत चुकीचे आहे. राजकीय पक्षाच्या अनेक कार्यक्रमात, आंदोलनात या झेंड्याचा मोठ्या प्रमाणत वापर होत असतो. त्यावेळी अनेक वेळा उत्साही कार्यकर्त्यांकडून शिवमुद्रा असणार्‍या झेंड्याचा गैरवापर होऊ शकतो. या शिवमुद्रेचा अवमान होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या नव्या झेंड्यावर शिवराजमुद्रेचा वापर करू नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. यासंदर्भात भापकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लेखी पत्र दिले आहे.

शिवराजमुद्रेला अनन्य साधारण महत्त्व…

मारूती भापकर यांनी राज ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे तसेच भारताचे आराध्य दैवत असून ते विश्‍ववंदनीय युगपुरुष आहेत. शिवरायांनी हिंदवी स्वराजाची स्थापना करताना रयतेच्या हितासाठी स्वतंत्र राजमुद्रा निर्माण केली. त्या राजमुद्रेचा वापर करूनच स्वराज्याचा कारभार होऊन त्यातूनच रयतेला अभिप्रेत असणारे लोककल्याणकारी रयतेचे राज्य निर्माण झाले. म्हणूनच शिवचरित्रात शिवराजमुद्रेला अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्र शासन देखील याच राजमुद्रेचा प्रशासकीय कामकाजात प्रतिक म्हणून वापरत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा आपला पक्ष 23 जानेवारीला वर्धापन दिन साजरा करत आहे. पक्षाचा पूर्वीचा झेंडा बदलून त्या झेंड्यातील निळा व हिरवा रंग काढून आता आपल्या पक्षाचा झेंडा संपूर्ण भगवा रंग असणारा झेंडा निश्‍चित करण्यात येणार आहे. या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवराजमुद्रा वापरली जाणार आहे हे अत्यंत चुकीचे आहे. आपण शिवभक्त आहात. शिवचरित्राचे जाणकार आहात. त्यामुळे आपण स्वतःहून आपल्या पक्षाच्या झेंड्यावर शिवराजमुद्रेचा वापर करणार नाहीत, अशी अपेक्षा मारूती भापकर यांनी व्यक्त केली आहे.