मनूर बुद्रुकला होम क्वारंटाईन व्यक्तींशी व्हॅाट्सअप व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क

0

बोदवड : तालुक्यातील मनूर बुद्रुक् येथे मुंबई परीसरातून आलेल्या दोन व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत. या नागरीकांना घरातीलच स्वतंत्र खोलीत विलगीकण करण्यात आले असून या व्यक्तींच्या घर व परीसरात सोडियम हायोक्लोराईडच्या द्रावणाने फवारणी करण्यात आली आहे तसेच तसेच हे द्रावण त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. दरम्यान. विलगीकरण केलेल्या व्यक्तींनी दिवसभरातून वेळोवेळी सेल्फी काढून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाठवण्याचे सूचना ग्रामस्तरीय समितीचे प्रभारी अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी दिल्या आहेत व त्याचे पालन केले जात आहे. स्वतः महेंद्र पाटील व्हिडीओ कॉल करून या लोकांची दिवसभरातून दोन-तीन वेळा चौकशी करून त्यांना धीर देत आहेत.

अधिकार्‍यांनी घेतला आढावा
मंगळवार, 31 रोजी बोदवड तहसीलदार रवींद्र जोगी, बोदवड नगरपंचायत मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, पोलिस निरीक्षक खरे यांनी मनूर येथे सायंकाळी भेट दिली असता आरोग्य उपकेंद्रात बसून महेंद्र पाटील यांनी या व्यक्तींचे या सर्व अधिकार्‍यांशी व्हिडीओ कॉल वर बोलणे करून दिले.

ग्रामपंचायतीने घेतली प्रचंड खबरदारी
कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता ग्रामपंचायत मनूरने 16 मार्च रोजी तातडीची बैठक घेऊन ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून त्यात सरपंच, उपसरपंच, सदस्य, आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक व स्वयंसेवक यांचा समावेश करण्यात आला.आणि 17 तारखेपासून मोठ्या शहरातून तसेच दुसर्‍या राज्यातून घरी परतलेल्या नागरीकांची नोंद घेतली. गावात अनुक्रमे फिनाईल आणि सोडियम हायपोक्लोराईड द्रावणाची फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक बसण्याची ठिकाणे, घरांचे ओटे, पायर्‍या, दरवाजे, फाटके, मंदिरे या सारख्या ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईड द्रावणाची फवारणी करण्यात आली तसेच ग्रामरोजगार सेवक व काही वॉर्डमधील तरुणांच्या मदतीने टप्या टप्याने फवारणी करणे सुरू आहे तसेच सोबत डास व माश्या यांच्यामुळे दुसरे आजार उदभवू नये म्हणून गटारींवर औषध फवारण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सरपंच नर्मदाबाई ढोले, उपसरपंच राजेंद्र शेळके सर्व ग्रामपंचायत सदस्य परस्पर संपर्कात राहून नियोजनास सहकार्य करत असल्याचे समिती अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितले.