‘मन की बात’ला उत्साही प्रतिसाद

0

पुणे : सोळाव्या लोकसभेच्या कार्यकाळातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेवटच्या ‘मन की बात’ला पुणेकरांनी उत्साही प्रतिसाद दिला. भाजपच्या वतीने शहरात विविध पाचशेठिकाणी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ सार्वजनिक ठिकाणी ऐकण्याचे कार्यक्रम आयोजित केले होते. पंचवीस हजारहून अधिक पुणेकरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांत विविध विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजना सुरू केल्या. आगामी काळात सरकारकडून जनतेच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या ‘भारत की मन की बात’ हा उपक्रम सर्व ठिकाणी राबविण्यात आला. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भारतीय जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि आगामी लोकसभेनंतर पुन्हा मोदीच पंतप्रधान होतील याचे प्रातिनिधीक चित्र पुणेकरांच्या उत्साही सहभागातून अधोरेखित होते असे मत गोगावले यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खासदार, आमदार, नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.