मराठा आरक्षण : आव्हान देणाऱ्या याचिकेवर १७ मार्च पासून अंतिम सुनावणी

0

नवी दिल्ली: पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश तसेच नोकऱ्यांममध्ये मराठा आरक्षण लागू करायचे किंवा नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १७ मार्चपासून अंतिम सुनावणीला सुरुवात करण्यात येईल असं सांगितलं आहे. आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशप्रक्रिया सुरू करावयाची असल्याने त्यात मराठा आरक्षण लागू करावयाचे किंवा नाही, या मुद्द्यावर अंतरिम आदेशासाठी सारडा यांनी सादर केलेल्या याचिकेवर नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील पीठापुढे आज सुनावणी ठेवण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने १७ मार्चपासून मराठा आरक्षणासंबंधी सुनावणीला सुरुवात करत याचिका निकाली काढणार असल्याचं सांगितलं आहे.

न्यायालयात सुनावणी सुरु असताना मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एका मोठ्या नेत्यांच्या मुलीने आझाद मैदानात जाऊन सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव घेतल्याने न्यायाधीशांनी यावेळी राजकीय नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला जाऊ नये असे मत नोंदवलं.