मशिदीत केवळ मौलाना वा ट्रस्टी करणार नमाज अदा

0

सहाय्यक निरीक्षक महेश जानकर : निंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील सर्व मशिदींच्या मौलाना व ट्रस्टींची बैठक

खिर्डी : मुस्लीम बांधवांचा साजरा होणारा सण शब ए बारात तसेच 25 एप्रिलपासून सुरू होणार्‍या रमजान मास निमित्ताने निंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील सर्व मशिदींच्या मौलाना ट्रस्टि तसेच मुस्लिम समाजातील प्रतिष्ठीत नागरीकांची पोलिस ठाण्यात बैठक झाली. प्रसंगी मशिदीत केवळ मौलाना वा ट्रस्टी यांनीच नमाज अदा करण्याच्या सूचना करण्यात आल्या तसेच मुस्लीम बांधवांनी घरी राहून नमाज अदा करावी, गर्दी टाळावी, अशा सूचना सहाय्यक निरीक्षक महेश जानकर यांनी केल्या.

संचारबंदीचे कठोर पालन करावे
संपुर्ण जगात कोरोनाने थैमान घातल्याने शासनाने संपूर्ण देशासह महाराष्ट्रात संचारबंदी लागू आहे त्यामुळे संचारबंदीचे तंतोतंत पालन कराव. तसेच मशीद, दर्गा, इदगाह आदी सर्व ठिकाणे बंद ठेवुन सदर ठिकाणी आत मध्ये कोणासही प्रवेश देवू नये तसेच कुणीही गर्दी करता कामा नये, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीस मौलाना अबुलखैर अशरफी, मौलाना रमजान अली अब्दुल मन्नान, मौलाना मकबुल इमदाद तडवी, मौलाना प्यार मोहंमद ताहेर खान, जाकीर वाहेद पिंजारी, अल्ताफ बेग रहिम बेग यांच्यासह निंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील सर्व मशिदींचे मौलाना, ट्रस्टी व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी निंभोर्‍याचे सहाय्य निरीक्षक महेश जानकर यांनी मार्गदर्शन केले. हवालदार राकेश वराडे, स्वप्निल पाटील, संदीप पाटील आदींनी परीश्रम घेतले.