महसूल प्रशासनाचे अधिकारी ठरले ‘चोरावर मोर’

0

खाजगी वाहनाने जात नदीपात्रात पकडले वाळूचे दोन डंपर


जळगाव: मंजूर झालेल्या ठिकाणाहून वाळुची उचल न करता थेट नदीपात्रातुन वाळुचा उपसा करून वाहुन नेणारे दोन डंपर आव्हाणे गावालगत पकडुन आज महसुलचे अधिकारी अक्षरश: चोरावर मोर ठरले आहेत. पकडण्यात आलेली ही दोनही वाहने सोडविण्यासाठी संबंधित ठेकेदार हे सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकुन होते.

जिल्ह्यात वाळु उपशाला बंदी आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात वाळुच्या डंपरमुळे अपघाताच्या घटना घडुन नागरिकांचा बळी देखिल गेला आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी रस्त्यावरून एकही डंपर वाळू वाहतुक करतांना दिसता कामा नये अशी तंबीच अधिकार्‍यांना दिली होती. महसुल विभागासह वाहतुक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागाकडुनही वाळुच्या अवैध वाहतुकीविरोधात कारवाई केली जात आहे. दरम्यानजिल्ह्यात काही ठिकाणी जप्त करून लिलाव झालेल्या वाळु स्थळावरूनच वाहतुक करण्याला मंजूरी आहे.

वाहन सोडविण्यासाठी ठेकेदाराचा तळ

प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांनी पकडलेले दोन्ही डंपर सोडविण्यासाठी संबंधित ठेकेदारासह काही जण सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकुन होते. मात्र पकडलेली दोन्ही वाहने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याने तळ ठोकुन असलेल्या ठेकेदारांसह सहकार्‍यांची निराशाच झाली.

पकडण्यात आलेले वाळुचे दोन्ही डंपर सोडविण्यासाठी जिल्ह्यातील एका वजनदार लोकप्रतिनीधीच्या स्विय्य सहायकाने प्रांताधिकार्‍यांना फोनही केल्याची माहिती मिळाली आहे. वाळु चोरी रोखण्यासाठी लोकप्रतिनीधी सभांमधुन आवाज उठवितात. मात्र दुसरीकडे वाळु चोरी करणारी ही वाहने सोडविण्यासाठी प्रशासनातील अधिकार्‍यांवर लोकप्रतिनीधी दबाव आणत असल्याचे यानिमीत्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.

मात्र मंजूर असलेल्या ठिकाणाहून वाळुची वाहतुक न करता थेट आव्हाणी शिवारातील नदीपात्रात उतरून वाळुचा अवैधरित्या उपसा करून वाहतुक केली जात होती. या विषयाची माहिती प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांना मिळाली होती. त्यानुसार आज दुपारच्या सुमारास प्रांताधिकारी दीपमाला चौरे व जिल्हा खनीकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांनी आज शासकीय वाहनाने न जाता खाजगी वाहनाने जात आव्हाणी नदी शिवार गाठले. कारवाईला जातांना पथकातील कर्मचार्‍यांचे मोबाईलही बंद करण्याच्या सुचना प्रांताधिकार्‍यांनी दिल्या. आव्हाणी नदीपात्रातुन वाळु उपसा करून दोन डंपर येतांना दिसले. त्यांनी रस्त्यातच ही दोन्ही वाहने पकडली. डंपर क्र. जीजे 21 व्ही 1622 व एमएच 19 झेड 3474 असे या दोन्ही वाहनांचे क्रमांक आहेत. ही दोन्ही वाहने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पुढील कारवाई होईपर्यंत सुपूर्द करण्यात आली आहे.