महानंदामध्ये पाच वर्ष राजकारणच झाले: पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला

1

जळगाव: महानंदा ही दुग्ध उत्पादन क्षेत्रात काम करणारी मातृसंस्था आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी ही संस्था महत्त्वाची आहे. दुधाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नगदी उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी महानंदा एक आशेचे किरण आहे, मात्र गेल्या पाच वर्षात महानंदामध्ये केवळ राजकारणच झाले असल्याचे आरोप दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता केले. माजी मंत्री भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी या महानंदाच्या चेअरमन असल्याने सुनिल केदार यांचा हा रोष अप्रत्यक्षरीत्या खडसे यांच्यावरच असल्याचे दिसून येते.

महानंदामध्ये आजपर्यंत झालेल्या राजकारणावर आता आम्ही विचार करणार नसून महानंदासाठी काम करणार असल्याचे मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. मला महानंदासाठी करायचे नसून शेतकऱ्यांसाठी करायचे आहे असेही मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर चुप्पी
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटल्याचे आरोप केले होते. यावरून राजकारण तापले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावरून नाराजी देखील व्यक्त केली होती. दरम्यान याबाबत मंत्री सुनिल केदार यांना विचारण्यात आले असताना त्यांनी चुप्पी साधली. आमच्या पक्षाचे प्रवक्ते, नेते आहेत तेच आव्हाड यांच्या विधानावर भाष्य करू शकतात असे सांगून त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.