महापारेषणची 132 केव्ही भूमिगत वाहिनी जेसीबीने तोडली

0 1

6 उपकेंद्रांचाही वीजपुरवठा खंडित : दोन लाख वीजग्राहकांना फटका

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या खोदकामात महापारेषण कंपनीची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने महापारेषणच्या रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा शनिवारी सकाळी 11.33 वाजता बंद पडला. परिणामी महावितरणच्या 6 उपकेंद्रांचाही वीजपुरवठा खंडित झाला, त्याचा सुमारे दोन लाख वीजग्राहकांना फटका बसला. यात दुपारी अडीच वाजेपर्यंत सुमारे 70 टक्के भागात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता.

चक्राकार पद्धतीने तात्पुरते भारनियमन

132 केव्ही वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महापारेषणकडून प्रयत्न सुरू झाले तरी या कामास 8 दिवसांचा कालावधी लागणार आहे, असे महापारेषणकडून सांगण्यात आले आहे. या कालावधीत 132 केव्ही रास्तापेठ जीआयएस उपकेंद्र बंद राहणार आहे. त्यामुळे इतर पर्यायी व्यवस्थेतून सुमारे 75 ते 80 मेगावॉट विजेचे भारव्यवस्थापन करावे लागणार आहे. मात्र वाढत्या उन्हामुळे काही परिसरात विजेचे भारव्यवस्थापन शक्य झाले नाही तर नाईलाजास्तव 2 ते 3 तासांचे चक्राकार पद्धतीने तात्पुरते भारनियमन करण्यात येणार आहे.

वीजेचा वापर आवश्यकतेनुसार करावा

पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात जलवाहिनी संबंधात पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटदाराकडून जेसीबीद्वारे गेल्या 10 दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. महापारेषणच्या पर्वती 220 केव्ही उपकेंद्रातून भूमिगत वाहिनीद्वारे रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो. ही भूमिगत वाहिनी या खोदकामात तोडली जाण्याची शक्यता असल्याने पुणे महानगरपालिकेला वीजवाहिनी असलेल्या भागात खोदकाम करू नये, असे वारंवार सांगण्यात आले होते. भूमिगत वाहिनी असलेली जागाही दाखविण्यात आली होती. मात्र यानंतरही त्या जागेवार सुरू असलेल्या खोदकामात शनिवारी सकाळी 11.33 वाजता महापारेषणची 132 केव्ही वीजवाहिनी तोडण्यात आली, अशी माहिती महापारेषणकडून देण्यात आली.

दुरुस्तीसाठी लागणार आठ दिवस

वीजवाहिनी तुटल्यामुळे रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला. या भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला जॉईंट चेन्नईवरून तातडीने विमानाद्वारे मागविण्यात आला आहे. मात्र या दुरुस्तीकामाला सुमारे 8 दिवसांचा कालावधी लागणार असल्याने रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद राहणार आहे, असे महापारेषणकडून सांगण्यात आले आहे. सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने भारनियमन टाळण्यासाठी किंवा त्याचा कालावधी कमीत कमी राहील यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या आठ दिवसांत या परिसरातील वीजग्राहकांनी विजेचा वापर आवश्यकतेनुसार व कमीतकमी करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.