महापालिका शिक्षण प्रशासन अधिकार्‍यांची तात्काळ बदली करा, सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

0

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे यांची बदली करण्यात यावी. त्या कामाप्रती जबाबदार नाहीत. त्यांना कुठल्याही विषयाची माहिती मागितली तर त्या देत नाहीत. शिक्षण विभागामध्ये सध्या सर्व कारभार अनागोंदी सुरू आहे. त्या जबाबदारपणे काम करीत नाहीत. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. महापालिकेच्या जानेवारी महिन्याच्या महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. या वेळी शिक्षण विभागाच्या कामगिरीवर बोलताना नगरसेवकांनी ही मागणी केली. नगसेवक राजू बनसोडे म्हणाले, शिक्षणाधिकारी आज सभागृहात उपस्थित नाहीत. मात्र ते त्यांच्या कार्यालयातही कधीच उपस्थित नसतात. कोणताही विषय त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर नगरसेवकांना कधीच त्या सविस्तर माहिती देत नाहीत. त्यांना ताबडतोब फोन करून त्यांनी सभागृहात हजर राहण्याची सूचना करा. आम्हा नगरसेवकांना त्यांना माहिती विचारायची आहे. यावर बनसोडे यांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत ज्योत्सना शिंदे सभागृहात येणार नाही तोपर्यंत खाली बसणार नसल्याची भूमिका घेतली. महापौरांनी त्या आजारी असल्याचे सांगितले. त्यावर बनसोडे यांनी आक्षेप घेत त्या आजारी आहेत तर त्यांनी पुढच्या महासभेमध्ये वैद्यकिय अहवाल सादर करण्याची मागणी केली. नगरसेवक दत्ता साने म्हणाले, शिक्षण विभागातील प्रशासन अधिकार्‍यांना कशाचेही गांभीर्य नाही. महापालिकेच्या वतीने रेनकोट, बूट, गणवेश, स्वेटर वाटप करण्यात येते. त्यावर नियंत्रण नाही. पावसाळ्यामध्ये स्वेटर आणि हिवाळ्यात रेनकोट वाटप असा उलट पुरवठा केला जातो. सहा महिने उशीरा वह्या दिल्या जातात. शाळांमध्ये साहित्य देण्यात खूप मोठे गौडबंगाल आहे. त्यामुळे शिंदे यांची बदली करणे संयुक्तिक राहील.

शासनाने बदली केली तर मी जायला तयार आहे. कामाच्या बाबतीत मी कुठलाही हलगर्जीपणा करत नाही. बूट, रेनकोट वाटप याबाबत ठेकेदार न्यायलयात गेले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर वाटप करण्यात आले. त्यामुळे उशीर झाला. बाकी सर्व साहित्य विद्यार्थ्यांना वेळेत दिले आहे. खरेदीचे सर्व विषय भांडार विभागाच्या अखत्यारित्य येतात. त्यामध्ये शिक्षण विभाग हस्तक्षेप करत नाही.

  • ज्योत्सना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग महापालिका