महापालिकेचा फुगविलेला ’स्मार्ट’ अर्थसंकल्प सादर

0

6183 कोटींचा अर्थसंकल्प; उत्पन्न वाढीबाबत ठोस पर्याय नाही

मालमत्ता करात कोणतीही वाढ नाही

पिंपरी- ’श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 37 वा सन 2019-20 यावर्षातील मूळ 4,620 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6,183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी 18 रोजी स्थायी समितीला सादर केला. 1391 कोटी आरंभीची शिल्लक दर्शविण्यात आली आहे. यंदाचे बजेट एक हजार कोटीने फुगले आहे. उत्पन्नवाढीचा ठोस असा एकही पर्याय यात सुचविला नाही. त्यामुळे फुगविलेले ’स्मार्ट’ बजेट ठरले आहे. स्मार्ट सिटी, अमृत अभियान, स्वच्छ भारत अभियान आणि पंतप्रधान आवास योजना या सरकारी योजनांसाठी तरतूद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, यंदा मालमत्ता कर, पाणीपट्टीत कोणतीही करवाढ करण्यात आली नाही.

अशी आहे तरतूद
सभापती ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. सामान्य प्रशासन विभागावर 62 कोटी, शहर रचना व नियोजन 50 कोटी, सार्वजनिक सुरक्षितता व स्थापत्य 208 कोटी, वैद्यकीय 171 कोटी, आरोग्य 243 कोटी , प्राथमिक शिक्षण 192 कोटी, उद्यान व पर्यावरण 83 कोटी, इतर विभाग 494 कोटी, भांडवली खर्च 2131 कोटी आणि कर्ज निवारण व इतरसाठी 698 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.