महापालिकेच्या 6 हजार 450 कोटींच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीकडून मंजूरी

0

42 उपसूचनांव्दारे 267 कोटींची वाढ

पिंपरी चिंचवड: महापालिका प्रशासनाने स्थायी समितीस सादर केलेला 2019-20 वर्षासाठीचा अर्थसंकल्प विनाचर्चा मंजूर करण्यात आला. एकूण 6 हजार 183 कोटींचा अर्थसंकल्पात 42 उपसूचनांद्वारे 267 कोटींची वाढ सुचविली आहे. स्थायी समितीने केलेल्या वाढीसह सुमारे 6 हजार 450 कोटींचा अर्थसंकल्पास अवघ्या पाच मिनिटांत मंजुरी दिली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मागील सभेत स्थायी समिती सभापतीला सुमारे 6 हजार 183 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर चर्चा आणि अभ्यासासाठी स्थायी समितीने सभा 28 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब केली होती. अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

विनाचर्चा मिळाली मंजूरी 
सन 2019-20 या आर्थिक वर्षाच्या 4620 कोटींच्या मूळ अर्थसंकल्पात 30 कोटी 24 लाख रुपये शिल्लक दाखविले होते. नवीन कोणताही प्रकल्प न राबविता स्मार्ट सुविधांवर आयुक्तांनी भर दिला होता. तर काही कामे मागील पानांवरून पुढील पानावर आली होती. तसेच उपसूचना स्वीकारणार की नाही? याबाबत साशंकता होती. मात्र, उपसूचना स्वीकारण्याचे धोरण सत्ताधार्‍यांनी स्वीकारले. त्यानंतर उपसूचनांची जमवाजमव सुरू होती. गुरुवारच्या सभेत अर्थसंकल्पावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, सदस्यांनी आयुक्तांच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले. अर्थसंकल्प चांगला आहे, असे गौरवोद्गार सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या सदस्यांनी काढले.

267 कोटींच्या उपसुचना
कोणतीही चर्चा न करता स्थायी समितीने 42 उपसूचनांचा स्वीकार केला. या उपसूचना 267 कोटींच्या होत्या. उपसूचनांसह 6 हजार 450 कोटींच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीने मंजूरी दिली आहे. स्थायीच्या मंजुरीनंतर अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे चर्चेला ठेवण्यात येणार आहे.