महापौर चषक शालेय क्रिकेट स्पर्धेत जयहिंद हायस्कूल मुलींचा संघ विजयी

0

पिंपरी :- महापौर चषक ‘टिन 20’ आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत जयहिंद हायस्कूल संघाने डॉ. डी. वाय. पाटील स्कूलचा 8 गडी राखून पराभव करीत 17 वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद प्राप्त केले. आदिती जोशी हिने नाबाद 24 धावा करीत विजयात महत्वाचा वाटा उचलला.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्पर्धा चिंचवड गावातील मोरया गोसावी मैदान येथे सुरू आहे. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जयहिंद स्कूलने 2 गडी गमावत 68 धावा केल्या. आदिती जोशी हिने नाबाद 24 धावा करीत तुफान फलंदाजी केली. साक्षी प्रसाद हिने 17 धावा करीत तिला साथ दिली. डॉ. डी.वाय. पाटील स्कूल संघ 1 गडी गमावत केवळ 66 धावा करू शकला. संचिता सोनवणे हिने 20 धावा, अपूर्णा काजळे हिने नाबाद 13, आज्ञा पाटील हिने नाबाद 12 आणि नम्रता कापसे हिने 18 धावा केल्या. विजयी संघाच्या खेळाडूंचे उपमहापौर तथा क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी अभिनंदन केले. उपांत्य लढतीत जयहिंद स्कूलने अभिषेक विद्यालयाचा 4 धावांनी पराभव केला. जयहिंद स्कूलने 2 बाद 83 धावा रचल्या. नम्रता कापसेने 38 व साक्षी रसाळने 27 धावा केल्या. पराभूत अभिषेक विद्यालय संघाने 3 गडी गमात 79 धावा केल्या. सलोनी कांबळेने 28 व अस्मिता जगताप हिने 9 धावा केल्या. स्पर्धेचे उद्घाटन माजी महापौर अपर्णा डोके यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, सामाजिक कार्यकर्ते आबा गावडे, योगेश कुंभार, क्रीडा पर्यवेक्षक राजू कोतवाल, हरीभाऊ साबळे आदी उपस्थित होते.