महाविकास आघाडीच्या काळात शेतकरी चिंताग्रस्त : आ. गिरीश महाजन

0

जळगाव: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शेतकर्‍याला चिंतामुक्त करण्याची घोषणा या सरकारने केली होती मात्र, प्रत्यक्षात यांच्या काळात शेतकरी चिंताग्रस्त झाल्याची टीका भाजपाचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केली. शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

भाजपाचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी आज जी. एम. फाऊंडेशन येथे भाजपाच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. यासंदर्भात आ. महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली.

आ. महाजन यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार रूपये मदतीची मागणी केली होती मात्र, त्यांनी प्रत्यक्षात आठ हजारांचीच मदत केली. भाजपा सरकारच्या काळात भारनियमन नव्हते. आता रात्री-बेरात्री भारनियमन केले जात आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ट्रान्सफार्मरचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतीबाबत महावितरणचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. हे प्रश्न तात्काळ सोडविले न गेल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आ. गिरीश महाजन यांनी ‘जनशक्ति’शी बोलतांना दिला.