महाविकास आघाडीत ठिणगी?; भीमा-कोरेगाववरून शरद पवार मुख्यमंत्र्यांवर नाराज !

0

कोल्हापूर: ‘भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास केंद्राच्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. राज्याच्या प्रकरणाचा तपास राज्याकडून काढून घेणे चुकीचे आहे, मात्र त्याला राज्य सरकारने परवानगी कशी दिली? अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पत्राद्वारे भीमा-कोरेगावचा तापस एनआयएकडे देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. कोल्हापुरात ते बोलत होते. त्यामुळे भीमा-कोरेगाव प्रकरणावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

भीमा-कोरेगावचा तपास एनआयए देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असताना मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घेतली आहे. ‘भीमा-कोरेगाव प्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. परंतु, भीमा कोरेगावबाबत इथल्या राज्याच्या गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची वागणूक अक्षेपार्ह आहे, अशी तक्रार आमच्याकडे अनेकांनी विशेषत: जैन समाजाच्या लोकांनी केली आहे. ज्यांची वागणूक आक्षेपार्ह आहे, याबाबत चौकशी झाली पाहिजे. याबद्दल चौकशीचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू होताच केंद्राने हा तपास राज्याकडून काढून घेतला होता, हे योग्य नाही असे त्यांनी सांगितले.