महिनाभरात 700 कोटी वसुलीचे उद्दिष्ट

0 2

मिळकतकर, पाणी पुरवठा विभागाकडे जबाबदारी

पुणे : महापालिकेचे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत मर्यादित आहेत. मात्र, त्याचवेळी खर्चाचे प्रमाण अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन मार्चमध्येच थकबाकी वसुलीसाठी तब्बल 700 कोटींचे उद्दिष्ट पालिकेने निश्चित केले आहे.

अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत मिळकतकर विभागास 400 कोटी, तर पाणीपुरवठा 200 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर राज्यशासनाकडून सुमारे 233 कोटींचे अनुदान मिळविण्याची जबाबदारी एलबीटी विभागाकडे देण्यात आली आहे. त्यातील 100 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

थकबाकी असलेल्या विभागांची बैठक

महापालिकेच्या अंदाजपत्रकाने साडेसहा हजार कोटींचा टप्पा गाठलेला असला, तरी प्रत्यक्षात महापालिकेस अजूनही 4 हजार कोटींच्या उत्पन्नाचा टप्प्पा अजूनही गाठता आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी महापालिकेस सुमारे 2 हजार कोटींची अंदाजपत्रकीय तूट येत असल्याचे चित्र आहे. त्याच वेळी पालिकेला वसूल करता येऊ शकणारी थकबाकीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी पालिकेकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात असल्या, तरी राजकीय मध्यस्थी करून अनेकांकडून थकबाकी भरली जात नसल्याचे चित्र आहे. तसेच निवडणुकांच्या तोंडावर लोकप्रतिनिधींकडून अभय योजना राबविली जाईल आणि मिळकतकरात सवलत मिळेल यामुळे नागरिक थकबाकी भरण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्रमुख थकबाकी असलेल्या विभागांची बैठक अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी घेतली.