महिलांच्या सक्षमीकरणासाठी महापालिका प्रयत्नशिल – महापौर जाधव 

0 1

पिंपरी – चूल आणि मूल ही म्हण विसरुन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजामध्ये महिलांचे योगदान मोठे आहे. पिंपरी-चिंचवड पहापालिकेच्या वतीने महिलांसाठी विविध प्रकारची शिबिरे व प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात येतात. या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने केले जात आहे, असे महापौर राहूल जाधव यांनी सांगितले.

नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त कै.अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ राजमाता जिजाऊ माँसाहेब व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आला.

यावेळी स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, महिला व बालकल्याण समिती सभापती स्विनल म्हेत्रे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, शिक्षण समितीच्या सभापती प्रा.सोनाली गव्हाणे, नगरसदस्या उषा ढोरे, साधना मळेकर, प्रियंका बारसे, यशोदा बोईनवाड, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, सहाय्यक समाजविकास अधिकारी सुहास बहादरपुरे तसेच व्याख्याते अशोक देशमुख उपस्थित होते. यावेळी  सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महापालिकेच्या वतीने देण्यात येणा-या सावित्रीबाई फुले पुरस्काराने अदिती निकम यांना सन्मानित करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असेही महापौर राहूल जाधव म्हणाले.

स्विनल म्हेत्रे म्हणाल्या, ”महिला ही नवीपढी तयार करण्याची ताकद आहे. ती कोणत्याही क्षेत्रात कमी पडणार नाही. जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेवून मुलींना शिकवा, प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्या. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील आहे”.