महिलांना ’तेजस्विनी’चा मोफत प्रवास !

0

सेवेमुळे येणारी तूट महापालिकेकडून संचलन तुटीतून दिली जाणार

पीएमपीएमएलच्या बैठकीत निर्णय

पिंपरी चिंचवड: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महिला प्रवाशांना पीएमपीएमएल प्रशासनाकडून जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर खास भेट दिली आहे. 8 मार्च पासून प्रत्येक महिन्यातील 8 तारखेला महिलांना ’तेजस्विनी’चा प्रवास मोफत असणार आहे. वर्षातून 12 दिवस महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. याबाबतचा निर्णय बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली. या सेवेमुळे येणारी तूट महापालिकेकडून संचलन तुटीतून दिली जाणार आहे.

तेजस्विनीच्या 38 बसेस 
जागतिक महिला दिनानिमित्त प्रवास करणार महिलांकरिता मोफत बस प्रवास देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याला संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 38 तेजस्विनी बस धावत आहेत. त्यापैकी पिंपरी-चिंचवड शहरात 23 तेजस्विनी बस धावतात. गतवर्षी महिलादिनानिमित्त सुरु करण्यात आलेल्या या तेजस्विनी बसने मार्च 2019 पर्यंत प्रतिमहिना 2.33 लाख व वर्षभरात 28 लाख महिलांनी प्रवास केला आहे.

महिला वाहकांची नेमणुक
बसचे प्रतमहिना 34 लाख 37 हजार 682 रुपये उत्पन्न आहे. तर, वार्षिक 4 कोटी 12 लाख 52 हजार रुपये उत्पन्न आहे. या बसमध्ये महिला वाहकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे तेजस्विनीने महिलांना सुरक्षित व सुखकर प्रवास होत आहे. गर्दीच्या मार्गावरील प्रवाशांचा प्रतिसाद घेऊन भविष्यात अशा मार्गांवर 25 ते 30 तेजस्विनी बसेसची वाढ करण्याचे नियोजन आहे.

भाडेतत्वावर घेणार 125 गाड्या
सैनिकांच्या विधवा पत्नीच्या बचत गट, संस्था, संघटनांनी खरेदी केलेल्या गाड्या पीएमपीएमएल भाड्याने घेणार आहे. त्यावरील चालक देखील माजी सैनिकच असणार आहेत. पीएमपीएमएल 440 गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. तर, 330 गाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत. याशिवाय बीआरटी मार्गासाठी 125 इलेक्ट्रीक गाड्या भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढून दळणवळण ’फास्ट’ होईल, असे विश्‍वास महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या 17 तारखेला पीएमपीएमएलची पिंपरी चिंचवड महापालिकेत बैठक होणार आहे. त्याला सर्व अधिकारी आणि संचालक उपस्थित असणार आहेत.