महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न ; आरोपीला पोलीस कोठडी !

0

औरंगाबाद: महिलेवर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात घडली. दरम्यान या प्रकरणी आरोपी संतोष सखाराम मोहिते याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत (१० फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी दिले.

या प्रकरणी सिल्लोड तालुक्यातील ५० वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, संबंधित पीडित महिला एकटीच राहते व तिच्या दोन्ही मुलींचे लग्न यापूर्वीच झाले आहेत. २ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ११ वाजता फिर्यादी घरात एकटीच असताना गावातील आरोपी संतोष सखाराम मोहिते (५०) हा तिथे आला व त्याने फिर्यादीच्या घराचे दार वाजवले. दार उघडताच समोर आरोपी संतोष दिसल्यामुळे, ‘तू रात्री-अपरात्री का येतो, तुझ्यामुळे माझी समाजात बदनामी झाली आहे’ असे ती त्याला म्हणाली. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले व संतप्त आरोपी संतोषने तिला शिवीगाळ व मारहाण करीत घरातील कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले आणि आरोपी पळून गेला.