माझ्यावर अन्याय; कोअर कमिटीकडून न्यायाची अपेक्षा- शीतल शिंदे 

0

पिंपरी- एक विचारधारा असलेल्या राष्ट्रीय पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी माझ्या नावाला राज्य, शहरातील ‘कोअर’ कमिटीने हिरवा कंदिल दाखविला होता. परंतु, ऐनवेळी काही झाले माहित नाही. त्यामुळे माझ्यावर न्याय झाला असून कमिटीने न्याय द्यावा, अशी मागणी बंडखोरी करत स्थायी समिती अध्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले भाजपचे नगरसेवक शीतल शिंदे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

शिंदे म्हणाले, स्थायी समितीमध्ये प्रत्येक सदस्याला एक वर्षाची संधी देण्याचे शहर ‘कोअर’ कमिटीचे धोरण ठरले होते. त्यानुसार गतवर्षी एक वर्ष झालेल्या भाजपच्या स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे घेतले होते. गतवर्षी स्थायी समितीत माझी निवड झाली होती. त्यावेळी देखील मी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी इच्छूक होतो. परंतु, संधी मिळाली नाही. त्यामुळे पुढील वर्षी आपल्याला राजीनामा द्यायला लागू नये. यासाठी मी गतवर्षी राजीनामा देऊन समितीतून बाहेर पडलो होतो. यावर्षी एक वर्ष पुर्ण झालेल्या सदस्यांचे राजीनामे घेतले नाहीत.

यावर्षी माझी निवड झाल्यानंतर मी अध्यक्षपदासाठी प्रबळ इच्छूक होतो. राज्य व शहर कोअर कमिटीनेही माझ्या नावाला हिरवा कंदील दाखविला होता. परंतू, ऐनवेळी काय झाले माहिती नाही. कमिटीच्या ठरलेल्या धोरणानुसार विलास मडिगेरी यांची स्थायी समिती सदस्यत्वाची मुदत संपत आहे. हे लक्षात आले नसेल. नजरचुकीने त्यांचे नाव आले असेल. माझ्यावर अन्याय झाला असून कमिटीने मला न्याय द्यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली. कमिटी न्याय देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.