माता रमाई महिलांचे प्रेरणास्थान व्हावे

0

कष्टकरी महिलांचे प्रेरणा स्थान म्हणजे माता रमाई. माता रमाई यांच्याबाबत आजपर्यत बहुतेक लिखाण हे भावनिक झाले आहे. रमाबाईंच्या कष्टाला, त्यागाला भावनिक केले गेले आहे. भिमराव आंबेडकर यांना जी साथ मिळाली ती भावनिक कधीच नव्हती ती पतीच्या कर्तव्य दक्षतेला मनापासून पत्नीची साथ होती. रमाबाईंबदल जेवढा आदर अडाणी वा असंघटित महिला ठेवतात तेवढा सुशिक्षित, नोकरी करणार्‍या महिला ठेवत नाही. अशा महिला आपल्या पतीला बिनपगारी कोणतेही काम करू देत नाही. (अपवाद असलेल्या महिलांचे अभिनंदन आणि त्यांची माफी.) प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो, तसाच एका अपयशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो.
रमाबाई ह्या बाबासाहेबांच्या प्रत्येक आंदोलनात मनाने सहभागी होत्या पण शरीराने नाही. मुलगा आजारी आहे, घरात पैसा नाही, नवरा तिकडे समाजसेवा करतो. असे सहन करणारी महिला आज शोधूनही सापडणार नाही. आजारात मुलगा मरण पावतो तरीही ती महिला विचलित न होता नवर्‍याबाबत राईचा पर्वत बनवित नाही. परिस्थिती समजून घेते. याला भावनिक मुद्दा कसा म्हणता येईल? हा समंजसपणा, दूरदृष्टीपणा होता. त्याला दुरदुष्टी म्हणता येईल. त्याकाळी बाबासाहेब आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बदलावी यासाठी शिकत नव्हते तर समाजाची परिस्थिती बदलण्याकरिता शिकत होते. हे रमाबाई समजू शकत होत्या. आजची एकही महिला असा विचार करणारी दिसणार नाही. रमाबाईंची रमाई कशी झाली हे किती लोकांना माहित आहे. बाबासाहेब शिक्षणाकरिता आणि समाजाला मानसन्मान मिळवून देण्याकरिता सतत ब्रिटिशांबरोबर पत्रव्यवहार करत, गाठीभेटी घेत असत. असेच एकदा राजगृहावर बाबासाहेब व रमाबाई राहत असताना त्यांना अचानक विदेशात महत्वाच्या कामानिमित्त जायचे होते पण रमाबाईला एकटे सोडून कसे जाणार हा प्रश्न पडला होता. तेव्हा बाबासाहेबांनी आपले एक मित्र, धारवाडचे वराळे काका यांच्याकडे रमाबाईला पाठविले.वराळे काका मुलांचे वसतिगृह चालवत असत. त्याच्या आवारात नेहमीच लहान मुले खेळायला येत असत. रमाबाईला दोनचार दिवसात मुलांचा लळा लागला. नेमके तीन दिवसांनंतर आवारात मुलांचा किलबिलाट दिसली नाही.वराळे काका चिंतेत दिसतात म्हणून रमाबाई काकांना विचारतात, मुले दोन दिवसात आवारात खेळताना दिसत नाही. कुठे गेली का? तेव्हा वराळे काका सांगतात, दोन दिवस झाले मुले उपाशी आहेत. त्यामुळे मुले खेळायला आली नाही. हे सांगताना वराळे काकांचा कंठ दाटून आला होता. त्यामुळे रमाबाई घरात आपल्या खोलीत जातात थोड्या रडत बसतात. नंतर कपाटातील डबा काढतात, त्यातील सोने आणि हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे काकांच्या हातात देतात. हे दागिने विका किंवा गहाण ठेवून ह्या मुलाच्या जेवणाचा बंदोबस्थ करा, असे त्या सांगतात. त्यानंतर मुले पोटभर जेवतात आणि खूप आनंदात राहतात. हे पाहून रमाबाई खूप आनंदी होतात. त्यामुळे सर्व मुले रमाबाईला रमाआई, रमाई म्हणून बोलवायला लागतात. तेव्हापासून रमाबाई ह्या रमाई झाल्या.
रमाबाईंचे पतिनिष्ठेचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब नेहमी जाहीरपणे सांगत असत, स्त्री हा समाजाचा अलंकार आहे. आपल्या कुटुंबाचा आणि कुळाचा नावलैकिक स्रियांच्या शिलावरच अवलबून असतो. स्त्री ही जशी गृहिणी तशी सुसंस्कारित समाज निर्माण करणारी माताही असते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनात सुरुवातीपासून शेवटपर्यंत रमाबाईंनी हाल, अपेष्टा, दुःख, गरिबी यांच्याशी संघर्ष केला. त्यामुळे त्या नेहमी आजारी राहत पण त्यांनी बाबासाहेबांकडे तक्रार केली नाही. त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती किती बदलली आहे. तेव्हा चळवळीकडे पैसा नव्हता पण जीवाला जीव देणारी माणस होती, त्यांना त्यांच्या घरुन चटणीभाकर मिळत होती. आज पैसा असल्याशिवाय माणसे येत नाहीत आणि घरची चटणीभाकर त्यांना गोड लागत नाही. आता कष्टाला, त्यागाला कुठे किंमत आहे? तेव्हा ती होती. म्हणून माता रमाईंच्या जयंतीनिमित्त सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा!