मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाचा ‘मुद्रण’ शोध !

0

जगभर जागतिक मुद्रण दिन म्हणून 24 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो. योहानेस गुटेनबर्ग ह्याला ‘मुद्रणकलेचा जनक’ संबोधले जाते. त्याचा जन्मदिवस म्हणजे मुद्रण दिन मानला जातो. या दिवसाचे औचित्य साधून मुद्रणकलेच्या शोधापासून ते मुद्रण कलेचे सद्यस्थितीचे नवे रूप म्हणजे ‘सोशल मीडिया’ आहे. मुद्रण ही क्रिया रूढ अर्थाने कागदावर किंवा तत्सम पृष्ठावर ठसा उमटविणे आहे. त्यावरून एकाच मजकुराचे किंवा चित्राचे अनेक ठसे उमटवून त्याच्या प्रती काढणे म्हणजे मुद्रण करणे असा अर्थ त्याला प्राप्त झाला. या तंत्राप्रमाणे त्याची व्याख्या म्हणजे योग्य अशा पृष्ठावर दाब देऊन रंग द्रव्याच्या साह्याने अक्षरे किंवा चित्र उमटविणे. मुद्रणाच्या शोधामुळेच आपण आज वैचारिकदृष्ट्या एवढे समृद्ध झालो आहोत. मात्र, तरीही रोझ डे, टेडी डे, व्हॅलेंटाइन डे असे विविध ‘डे’ आपणास ज्ञात असतात, लक्षातही असतात. परंतु जागतिक मुद्रण दिन नावाचा एक दिवस जगभर साजरा केला जातो हे आपल्याला माहितही नसते आणि जरी माहित असेल तरी ते आपण अगदी सहज विसरूनही जातो. अशा जागतिक मुद्रण दिनानिमित्त त्याच्या प्रवासावर टाकलेला हा दृष्टीक्षेप…..

मुद्रणकलेने अनेक स्थित्यंतरे पचविली आहेत. ग्रंथाचे मुखपृष्ठ ते मलपृष्ठ असा संपूर्ण प्रवास झाला आहे. मुद्रण कलेचा इतिहास तसा फार तर दोनशे वर्षांइतकाच मर्यादित आहे, असे म्हणता येईल. पण काळाची गती आणि काळाची गरज याचे अचूक भान ठेवल्याने मुद्रणाची महती आता पटू लागली आहे. अलीकडच्या काळात अक्षरसमूह किंवा चित्रे मुद्रित करण्यासाठी पुष्कळ प्रकारची तंत्रे अस्तित्वात आली आहेत. पण त्या तंत्रांमध्ये यांत्रिक पद्धतीने दाब देऊन ठसा उमटविणे किंवा त्या मुद्रणासाठी रंगद्रव्याचे साहाय्य घेणे या गोष्टींचा समावेश होत नाही. या नवीन तंत्राच्या विकासामुळे जुन्या व रूढ तंत्रांचा वापर पुढे कदाचित पूर्णपणे थांबेल. त्यामुळे मुद्रणाची नवीन व्याख्या म्हणजे अलीकडील नवीन तंत्राचा वापर करून काळ्या किंवा रंगीत शाईचा उपयोग करून कोणत्याही टिकाऊ पृष्ठावर अक्षरे किंवा चित्रे मुद्रित करून अनेक प्रती काढणे अशी करता येईल. मुद्रणामध्ये सुरुवातीला शिसे, शाई, कागद, यंत्रे आदी गोष्टी वापरल्या गेल्या. त्यामुळे मुद्रणाशी सर्वच गोष्टीची सांगड आपोआप घातली गेली. पण नंतर या तंत्राचा जो विकास होत गेला त्यामुळे या तंत्रात अमाप बदल झाला.

इसवी सनानंतरच्या दुसर्‍या शतकात चिनी लोकांनी मुद्रणाची पद्धत शोधली. त्या पद्धतीत लागणारी उपकरणे म्हणजे कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा. मुद्रण प्रतिमा ही कोरून तयार केलेल्या पृष्ठाची होती. त्या काळात काही मजकूर संगमरवरी खांबावर कोरून ठेवलेले असत. जेव्हा यात्रेकरू अशा ठिकाणी जात तेव्हा या कोरलेल्या मजकुरावर विशिष्ट शाई लावून त्यावर ओलसर कागद दाबून मुद्रणाचा ठसा मिळवित. या गोष्टीवरून चिनी लोकांना मुद्रण प्रतिमेद्वारा प्रिंटिंगचे तंत्र सापडले. सहाव्या शतकानंतर मात्र त्या संगमरवरी दगडाची जागा लाकडाने घेतली. कारण दगडावर अक्षर कोरण्यापेक्षा लाकडावर कोरणे जास्त सोयीस्कर होते. इ. स. 1041-48 या कालखंडात ‘बी शंग’ नावाच्या चिनी मयागाराने मुद्रणासाठी चल खिळ्यांची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. मुद्रणाच्या कलेतील मोलाचा दगड म्हणजे 1434 ते 1439 हा काळ या काळात जर्मनीतील र्‍हाईनलँडमध्ये योहान गुटेनबर्ग यांनी धात्वलेखी मुद्रण नावाचा प्रकार शोधला. असे म्हटले जाते की तो प्रकार यपूर्वीही अस्तित्वात होता. मात्र, असे कोणतेही पुरावे मिळत नाहीत. गुटेनबर्ग याने मुद्रा, मातृका व शिशाचा संयुक्त उपयोग करून टिकाऊ अशी अक्षरे मोठ्या संख्येने तयार करणे व प्रत्येक अक्षर दिसायला सारखे निर्माण केले. या प्रकारचे मुद्रण-तंत्र वापरून गुटेनबर्ग याने 40 पानांचे बायबल छापले. गुटेनबर्ग यांचा मूळ व्यवसाय चांदीच्या कारागिरीचा होता. त्यांनी योहान फूस्ट यांच्याबरोबर जर्मनीमध्ये माइनत्स येथे जो मुद्रणाचा व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू केला. त्यामध्ये त्यांनी फक्त आराखडा तयार करणारा भागीदार म्हणून काम केले. 1455 साली गुटेनबर्ग यांनी चल अक्षरांचा व मुद्रणाचा शोध लावला.

पॅरिसमध्ये 1790 च्या सुमाराला स्टीरिओ टाइपचा उपयोग यशस्वीरित्या केला. स्टीरिओ टाइपचा एक निराळा प्रकार म्हणून 1848 नंतर विद्युत विलेपन करण्याच्या पद्धतीने हे तंत्र वेगळ्या स्वरूपात वापरले गेले. अमेरिकेत ‘लिबर्टी’ नावाच्या एका यंत्राची रचना 1857 मध्ये केली गेली होती. या यंत्रात पाट्याची हालचाल यांत्रिकपणे होत असे व पायाने एक दांडी दाबून धरली की, गादीच्या पृष्ठावर पाटा दाबून धरला जात असे. 1865 मध्ये अमेरिकेमध्ये विल्यम बुल्क यांनी प्रथम कागदाची रिळे यंत्रावर लावून छपाई करण्यासाठी अखंड चक्रीय गतीच्या पद्धतीचे यंत्र तयार केले. या यंत्रावर मुद्रणानंतर कागद कापण्याची योजना अंतर्भूत होती. तासाला पूर्ण वर्तमानपत्राच्या 12 हजार प्रतींची छपाई करण्याची क्षमता त्या यंत्रात होती. 1870 नंतर याच यंत्रात स्वयंचलित घड्या घालणारे मशीन नव्याने घालण्यात आले. 1880 नंतर अमेरिकेत ओटमार मेर्गेन्टालर यांनी ‘लायनोटाइप’ नावाचे एक पूर्ण ओळ जुळविण्याचे यंत्र शोधून काढले. अमेरिकेत 1885 मध्ये टॉलबर्ट लॅन्स्टन यांनी ‘मोनोटाइप’ अक्षरजुळणी यंत्राचा शोध लावला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रतिरूप (ऑफसेट) मुद्रणाची सुरुवात झाली.

इ.स.1950 नंतर बी.बी.आर.पद्धतीने कार्यक्रमात अक्षर जुळणीचे तंत्र सुरू झाले. 1964 साली प्रथमच जपानमध्ये ‘मैनिशी शिंबून’ या वर्तमानपत्राने याबाबतीत प्रयोग करून पाहिला. ‘क्ष’ किरण नलिकेच्या पडद्यावर वर्तमानपत्राच्या सर्व पानांची प्रतिमा प्रथम जुळवून दूरचित्रवाणीप्रमाणे रेडिओ तरंगांद्वारा त्याचे प्रेषण करण्यात आले. यानंतर काहीच दिवसात संगणकावरून कमांड देऊन मुद्रणाचे तंत्र विकसित झाले. मुद्रण अतिशय सोप्या आणि कमी वेळात पूर्ण होणारे झाले. इथून पुढचा विकास आपल्या डोळ्यासमोरच झाला. हा मुद्रणाचा विकास होत असतानाच संगणक नावाच्या यंत्राचा प्रवेश मानवाच्या जीवनात झाला. संगणकाच्या विकासासोबतच इंटरनेटचे आगमन झाले. 24 जानेवारी 2004 रोजी ऑरकुट नंतर जीमेल. मग 4 फेब्रुवारी 2004 रोजी फेसबुक आणि गुटेनबर्गची जागा झुकरबर्गने घेतली.

मुद्रण तंत्राची सुरुवात झाल्यानंतर गेल्या पाच शतकांहून जास्त काळ या तंत्राने सुसंस्कृत समाजावर एक प्रकारे प्रभुत्व ठेवले आहे. ज्ञानाचा ठेवा जतन करून ज्ञानप्रसाराचे काम कौशल्याने केले आहे. मुद्रणाच्या उपयुक्ततेला अलीकडच्या बिनतारी संदेशवहन, दूरचित्रवाणी, सूक्ष्मपट (मायक्रोफिल्म), फीत ध्वनिमुद्रण आदी प्रगत तंत्रांनी फार मोठे आव्हान दिले आहे. या आव्हानाला मुद्रण तंत्रच पुष्कळसे कारणीभूत झाले आहे. तरीही मुद्रण तंत्राला स्वतंत्रपणे फार मोठे क्षेत्र उपलब्ध आहे. पुस्तके किंवा वर्तमानपत्रांसाठीच फक्त या तंत्राचा वापर मर्यादित राहिलेला नाही. कापडावर, पत्र्यावर, भिंतीच्या कागदांवर, आवेष्टनांवर किंवा मोठ्या जाहिरातींवर मुद्रणाच्या अनेक तंत्रापैकी एकाचा वापर करून मुद्रण केले जाते. अतिसुक्ष्म अशा इलेक्ट्रॉनीय मंडलाच्या उत्पादनासाठीही मुद्रण तंत्राचा उपयोग केला जातो.

मुलांना पुस्तक हवे हवेसे वाटावे, याकरिता ते पुस्तक सर्वार्थाने मुलांच्या मानसिकतेत सामाविणारे असले पाहिजे. आज हे अनेक मार्गाने व अनेक पद्धतीने करणे शक्य होत आहे. मराठीत दिवाळीनिमित्त निघणारे बालकांचे विशेषांक लक्षावधीचा खप गाठतात. तेव्हा मुले वाचत नाहीत, असे म्हणणे हे वावगे ठरणारे नाही. मुले वाचतात. पण त्यांनी वाचावे याकरिता तसे रूप असलेली पुस्तके त्यांच्यासमोर जाणे अगत्याचे ठरते. अमेरिकेसारख्या प्रगत देशात मुलांच्या बागांमध्ये आज मोठमोठ्या ठशातील पुस्तके खुल्या बागेतच ठेवलेली असतात. मुलांनी येता जाता ती पुस्तके पहावी, वाचावीत अशीच योजना यामागे असो. वाचन संस्कृती रुजविण्याकरिता विकसित झालेली आजची मुद्रण संस्कृती आपणाकरिता खूपच उपकारक आहे. त्याकरिता पुस्तकाचे समग्र सौंदर्य लक्षात घेऊन त्याची रचना होणे गरजेचे असते.

मुद्रण कला आता शास्त्रात परावर्तित होत आहे. एखाद्या कलेला जेव्हा शास्त्राचा आधार प्राप्त होतो तेव्हा ती कला अधिकच खुलून दिसते. बदलत्या काळात मुद्रणाचा महिमा कितपत टिकून राहील याबद्दल आपण साशंक असण्याचे कारण नाही. कारण किमान पन्नास वर्षे तरी मुद्रण कलेला मरण नाही, असे आज या क्षेत्रातील जाणकार सांगतात. केशवसुतांच्या जन्मशताब्दी वर्षात महाराष्ट्र सरकारने त्यांची अप्रकाशित डायरी जशीच्या तशी प्रकाशित करून सरकार हेही करू शकते, हे दाखवून दिले. तसेच बालकवींच्या जन्मशताब्दी वर्षात ‘लोकराज्य’ने असाच एक बहारदार विशेषांक प्रकाशित केला होता. संस्कृती संगम होण्याकरिता आज मुद्रण कला ही फार महत्त्वाची आहे. ती मध्यस्थाची भूमिका बजावू शकते. हा केवळ देवाणघेवाणीचा व्यवहार नाही तर तो अक्षर संवादाचा आनंद आहे. म्हणूनच मुद्रणाची महती शंकातीतही आहे व कालातीतही आहे असे अवश्य वाटते. प्रत्येक प्रकाशकांनी याचे सजग भान ठेवले तर मुद्रण कलेचा किर्ती सुगंध आणखीनच आकाशात पसरेल असा आहे. मुद्रण हाच मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाचा शोध आहेे. आपल्या मनातील विचारांची अभिव्यक्ती मुद्रण कलेच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचू शकते, हेही तेवढेच खरे!