मानसिक उपचारांसाठी दृकश्राव्य माध्यमे प्रभावी – डॉ. मोहन आगाशे

0 1

पुणे : मनोरुग्णांकडून आपण काय शिकतो, याची माहिती केअरटेकर’ आणि या क्षेत्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. मानसिक आजारांवरील उपचारासाठी दृकश्राव्य माध्यमांचा वापर अधिक प्रभावी ठरतो. त्यामुळे त्याला पूरक अशा चित्रपटांचा आपण वापर केला पाहिजे, असे मत डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले. मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या वतीने मानसिक आरोग्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. इंग्लंडमधील कन्सर्न फॉर मेंटल हेल्थ’च्या टीम’ने यावेळी मार्गदर्शन केले. भारतीयांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मुकुल माधव फांऊडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षण शिबिरात 115 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी लंडनच्या डॉ. गझला अफझल, मौडस्ली हॉस्पिटल’च्या डॉ. मिलाविक, नॉर्थ ईस्ट लंडन फाउंडेशन’चे डॉ. हॉर्ने यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील फिजिशियन्स’, मनोविकारतज्ज्ञ, नर्सेस’, विशेष शिक्षक आदींनी सहभाग घेतला.

अद्ययावत प्रशिक्षण देणे आवश्यक

डॉ. गझला अफजल म्हणाल्या, मानसिक आजारांबाबत प्रागतिक दृष्टीकोन आहे. या उपचारांचे चांगल्या पद्धतीने वितरण होत आहे. परंतु, बालकांच्या मानसिक आजारांवर उपचार करणार्‍या मानसोपचार तज्ञांची भारतात मोठी कमतरता आहे. त्यामुळेच अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून अद्ययावत प्रशिक्षण देणे आवश्यक वाटते.रितू छाब्रिया म्हणाल्या, मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत नर्स, मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील इतर व्यावसायिकांसाठी 2014 पासून हे प्रशिक्षण आहे. यामुळे रुग्णांचे मानसिक आरोग्य वेगाने सुधारण्यास मदत होते. यासाठी इंग्लंड’मधील तज्ञांना बोलावले जाते. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग येथील लोकांना होत आहे.