मार्केटयार्डात 20 डमी आडत्यांवर कारवाई

0 1

28 हजार 270 रुपयांचा वसुल केला दंड

पुणे : मार्केटयार्डामधील फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा आणि फूल विभागातील डमी आडत्यांवर कारवाई करण्यास कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकतीच सुरुवात केली आहे. भाजीपाला विभागातील सुमारे 20 गाळ्यांवरील डमी आडत्यांवर कारवाई करीत त्यांच्याकडून 28 हजार 270 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, डमी आडत्यांवर कारवाई तीव्र केली जाणार असून, कारवाईमध्ये सातत्य ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान

मार्केटयार्डात भाजीपाला, फळे, फळबाजार आणि तरकारी विभागात एका गाळ्यावर 2 डमी आडत्यांना मदतनीस म्हणून ठेवण्यास बाजार समितीने परवानगी दिली आहे. मात्र, आडत्यांच्या एका गाळ्यावर 4 ते 8 डमी आडत्यांची संख्या झाली आहे. डमी आडते कमी भावात शेतमाल खरेदी करून मूळ आडत्याच्या गाळ्यासमोरच चढ्या भावाने शेतमालाची विक्री करतात. यात शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होते आणि वाहतूक कोंडी होते. तर, डमी आडते मालामाल होतात.

निर्णयाची अमलबजावणी झाली नाही

बाजार आवाराला शिस्त लावण्यासाठी समितीने गेल्या वर्षी नवीन नियमावली केली. त्यानुसार काही काळ या नियमांची अंमलबजावणीसह कारवाईही झाली. मात्र, काही दिवसांपासून डमी आडत्यांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे. याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होते. तर, आडत्यांची संघटना असलेल्या आडते असोसिएशनच्या झालेल्या एका सर्वसाधारण सभेतही दोनच डमी आडते ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाची अंमलबाजवणी झालीच नाही. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने कारवाई सुरू केली आहे.