मावळच्या उमेदवारीवरुन पवारांची नवीन ‘गुगली’

0

पार्थच नव्हे तर इतर कोणताही राष्ट्रवादीचा उमेदवार असेल

महापालिकेतील सत्ता गेलीच कशी?; व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद

पिंपरी-माढ्यातून राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर मावळमधून त्यांचे नातू पार्थ पवार यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित मानली जात आहे, तसे स्पष्ट संकेत देखील शरद पवार यांनी दिले होते. मात्र आता त्यांनी पुन्हा मावळमधील उमेदवारीबाबत नवीन गुगली टाकली आहे. मावळ लोकसभेसाठी पार्थच नव्हे, तर इतर कोणताही राष्ट्रवादीचा उमेदवार असेल. त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचा असा सल्ला कार्यकर्त्यांना देत पुन्हा एखदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स वाढवला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील बुथप्रमुखांबरोबर पवार यांनी बुधवारी 13 रोजी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्नारे संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. यावेळी पार्थ पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रदेश सचिव उमेश पाटील, भाऊसाहेब भोईर, मावळचे तालुकाअध्यक्ष बबनराव भेगडे यांच्यासह बुथप्रमुख उपस्थित होते.

अद्याप उमेदवार निश्‍चित नाही
मावळचा राष्ट्रवादीचा उमेदवार अद्यापही जाहिर झालेला नाही असे सांगितले. तसेच येत्या दोन-तीन दिवसांत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची सांगत मावळच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकार्‍यांकडून बूथ कमिटीच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच बूथ कमिट्यांच्या कामकाजात आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले.

सोशल मिडीयावर लक्ष द्या
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर अ‍ॅक्टीव्ह व्हावे. त्याकडे लक्ष द्यावे. जागरुक रहावे. खोटी बातमी आल्यास तातडीने खोडण्यात यावी. लगेच सोशल मिडीयातून उत्तर दिले पाहिजे. पण हे सगळे करताना कायद्याच्या चौकटीत काम करावे. कायद्याच्या उल्लंघन होऊ नये. याची दक्षता घ्यावी, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

इव्हीएमवर शंका
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचंड विकासकामे केली, असे असतांनाही महापालिकेतील सत्ता कशी गेली याची मला शंका आहे. ‘मशिन’मध्ये काही गडबड झाली असे मला वाटते, एवढे काम झाल्यावर नागरिक खूश असताना सत्ता जाणे सोपे नव्हते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या पालिकेतील विजयावर शंका उपस्थित केली. निकाल मान्य असल्याचे सांगत, आता बघतो, एकतो तर महापालिकेत केवळ गोंधळ चालू आहे असेही ते म्हणाले.

धनगर समाजाची फसवणूक
गेल्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत येऊन धनगर समाजाला आम्हाला सत्ता द्या, मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत तुम्हाला आरक्षण देऊ असे सांगितले. परंतु, आजपर्यंत आरक्षण दिले नाही. याउलट थातूर-मातूर गोष्टी करुन त्यांची फसवणूक केली. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. मुस्लिम समाजाला आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही. समाजातील सर्वंच स्तरातील लोकांना आश्‍वासन दिले. परंतु, एका आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. नोटाबंदी अयशस्वी ठरली. नोटाबंदीने 15 लाख लोकांची नोकरी घालविली. त्यामुळे बेकारी वाढली आहे.

आश्‍वासने पाळणी नाही
मुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. मात्र, एका रुपयाचे काम देखील झाले नाही. सत्ताधारी पक्षाच्या कामावर लोक समाधानी नाहीत. भरपूर आश्‍वासने द्यायची आणि कोणत्याची आश्‍वसनाची पूर्तता करायची नाही, हे सरकारचे वैशिष्टये आहे. विद्यमान राज्यकर्त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.