मावळमधून  पार्थ पवार तर शिरूरमधून डॉ.अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर

0

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होणार्‍या मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने शुक्रवारी (दि. 15) उमेदवार जाहीर केले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात अजितदादांचे पुत्र पार्थ पवार आणि शिरूर मतदारसंघात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात मावळ आणि शिरूर हे दोन लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहेत. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवर मिळत नाहीत, असे चित्र निर्माण झाले होते. अनेकांच्या नावांची चर्चा झाल्यानंतर आता अखेर दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीने आयात उमेदवार दिले आहेत.

मावळ मतदारसंघाच्या उमेदवारीवरून पवार कुटुंबामध्ये गृहकलह निर्माण झाला होता. अजितदादांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून इच्छुक होते. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार हे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पवार कुटुंबामध्ये बरेच रामायण घडले. त्यामुळे अजितदादा आणि पार्थ पवार यांच्या हट्टापुढे नमते घेत शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून स्वतः माघार घेतली.

या गृहकलहाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी शुक्रवारी (दि. 15) जाहीर केली आहे. त्यामध्ये मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.