मावळमधून संजोग वाघेरे इच्छुक?

0 2

पार्थ पवारांची उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतरही सोशल मिडीयावरुन वाघेरेंच्या नावाची चर्चा

सोशल मिडीयावरुन दोघांच्या नावावरुन कल जाणण्याचा प्रयत्न

पिंपरी- पार्थ पवार हे मावळ मतदार संघातून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असल्याची घोषणा झालेली असताना पिंपरीतील राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार संजोग वाघेरे यांना अद्याप देखील उमेदवारीची अपेक्षा लागल्याचे दिसते. त्यांच्या समर्थकांनी मावळचा उमेदवार कोण, असा प्रश्‍न देऊन त्याखाली पार्थ पवार आणि संजोग वाघेरे या दोघांच्या नावांचा पर्याय असलेली पोस्ट सोशल मीडियावर जोरात शेअर केली आहे. याद्वारे मावळमधील लोकांचा कौल पाहण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते.

प्रचाराचा जोर मंदावला
मावळ लोकसभा मतदार संघातून पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेर यांनी तयारी सुरू केली होती. लोकांच्या गाठीभेटी गेऊन त्यांच्याशी चर्चा करून संवाद-विवाद साधला गेला. उरण, पनवेल, मावळ, लोणावळा या भागातील मंडळे, सोसायट्या, पंतसंस्था, कामगार मंडळे आदी संस्था-संघटनांच्या प्रमुखांशी वाघेरे यांनी संभाषण साधले आहे. त्यांचा पाठिंबा घेऊन लोकसभा लढविण्याची जोरदार तयारी त्यांनी सुरू केली होती. मात्र, अचानक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव पुढे आल्याने वाघेरे यांचा प्रचाराचा जोर मंदावला गेला.

पक्षाच्या उमेदवारासाठी काम करणार
पार्थ पवार हेच लोकसभा निवडणूक लढवतील, याला शरद पवार यांनी दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या मावळ मतदार संघाच्या उमेदवारी शिक्कामोर्तब झाले आहे. तरीही देखील वाघेरे यांना यात बदल होईल, आणि आपले नाव मावळच्या उमेदवारीसाठी घोषीत केले जाईल, अशी अपेक्षा लागलेली दिसते. पक्षाने तिकीट दिले तर मावळ लोकसभा लढणार, अन्यथा जो कोणी पक्षाचा उमेदवार असेल त्याचे मनापासून काम करणार, असे वाघेरे यांनी स्वतः जाहीर केले आहे. तरी देखील त्यांना पार्थ यांना डावलून आपल्याला उमेदवारी मिळेल असा भास होत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर मावळ मतदार संघातून राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार कोण, असा प्रश्‍न देऊन त्याला पार्थ पवार आणि संजोग वाघेरे यांच्या नावाचे दोन पर्याय दिले आहेत. ती पोस्ट सोशल मीडियावर दिवसभर व्हायरल होत आहे.