मुंबईतील बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक घोषित !

0

मुंबई: मुंबईमधील परळ भागातील चाळीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी केली. या ठिकाणी बाबासाहेबांनी २२ वर्ष वास्तव्य केले होते. चैत्यभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरळीतील बीआयटी चाळीला भेट दिली. बीआयटी चाळ क्र. १ मधील खोली क्रमांक ५० व ५१ या दोन खोल्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबीयांचे १९१२ ते १९३४ असे प्रदीर्घ काळ वास्तव्य होते. येथूनच ते विश्वविख्यात विद्वान व महामानव म्हणून प्रसिद्धीस पावले. त्यांच्या जीवनात या वास्तूचे खूप महत्त्व होते.

बीआयटी चाळ क्रमांक १ मधील या दोन खोल्यांमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे योग्य पुनर्वसन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील हा एतिहासिक वास्तूरूपी अमूल्य ठेवा जतन करावा आणि त्या ठिकाणी यथायोग्य स्मारकाची निर्मिती करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. आज हा निर्णय घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मागणीची पुर्तता केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देण्यासाठी गुरुवारी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे, मुंबईतील हिंदू कॉलनी, दादर पूर्व येथील परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह ते चैत्यभूमीपर्यंत ‘कँडल मार्च’ काढण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र विचार, त्यांच्या पवित्र विचारांचा प्रकाश संपूर्ण जन्मानसापर्यंत पोहचवणे हे या ‘कँडल मार्च’चे उद्दिष्ट असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.