मुंबईप्रमाणे पुणे शहरातही नाईट लाईफ सुरू ठेवा

0

‘नाईट शिफ्ट’च्या कर्मचार्‍यांची गैरसोय टाळता येईल

राष्ट्रवादी कार्यकर्ते संदीप काटे यांची सरकारकडे मागणी

पिंपरी चिंचवड ः मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळात नुकताच घेण्यात आला. हा निर्णय पुण्यातही लागू करण्यात यावा. जेणेकरून पुणे शहरात ‘आयटी पार्क’ असेल किंवा अन्य खासगी आस्थापनांमध्ये रात्री काम करणार्‍या कर्मचार्‍याची गैरसोय होणार नाही. व्यावसायिक दृष्ट्या हा निर्णय पुणे शहरासाठी उत्तमच ठरेल. शिवाय, व्यासायिकांच्या माध्यमातून सरकारला मिळणारा जो महसूल आहे, त्यात नक्कीच वाढ होईल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी सरकारकडे केली आहे.राज्यमंत्री मंडळाची बैठक 22 जानेवारी रोजी पार पडली. या बैठकीत मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू ठेवण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. मुंबईमध्ये 27 जानेवारीपासून ‘नाईट लाईफ’ सुरू होणार आहे. रोजगार निर्मिती आणि महसूल वाढवण्याबरोबर लोकांना 24 तास सेवा मिळावी, या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे शहरात रात्रीचे कामे राहतात सूरू…
मुंबई नाईट लाईफचा राज्य मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय पुणे शहरासाठीही लागू करावा. कारण, मुंबईनंतर राज्यात पुणे द्वितीय क्रमांकाचे शहर गणले जाते. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कॅम्प, मगरपट्टा सिटी, हिंजवडी, वाकड, पिंपरी, बाणेर, कोथरूड, हडपसर, औंध, वाकड, शिवाजीनगर, कोरोगाव पार्क, खराडी, विमाननगर, कर्वेनगर, स्वारगेट, कल्याणीनगर, एफसी रोड, येरवडा आदी भागात आयटी पार्क, ट्रान्सपोर्टेशन, एक्सपोर्ट-इम्पोर्ट, ट्राव्हल्स अशा अनेक क्षेत्रातील कंपन्या रात्रपाळीत चालतात. त्यामध्ये इन्फोसिस, टीसीएस, केपीआयटी, कॉग्निझंट, विप्रो, कॅपजेमिनी अशा अनेक नामांकीत कंपन्या आहेत. तर, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये टाटा, फोर्स मोटर्स, सेंच्युरी एन्का, भारत फोर्स, बजाज ऑटो, फिनोलेक्स केबल, कल्याणी स्टील, किर्लोस्कर, थरमॅक्स, वेंक्कीज इंडिया अशा असंख्य कंपन्या रात्रीसुद्दा कार्यरत असतात. त्यामुळे पुणे हे रात्री सुध्दा मुंबईप्रमाणे कार्यरत राहणारे शहर आहे. त्यामुळे रात्रपाळीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांची शहरात वर्दळ असते. त्यांच्या सोयीसाठी पुणे शहरात सुध्दा नाईट लाईफ सुरू ठेवण्याचा निर्णय लागू करावा, अशी मागणी संदीप काटे यांनी केली आहे.


रात्रीअपरात्री कंपनीच्या बाहेर हॉटेल्स, स्नॅक्स, कॉफी सेंटर सुरू नसतात. त्यामुळे कंपनीत रात्रपाळीने काम करणा-या कर्मचा-यांची गैरसोय होते. मुंबई प्रमाणे पुणे शहरातही नाईट लाईफचा निर्णय लागू करण्याची गरज आहे. त्यातून व्यावसायिकांना व्यवसाय करता येईल. ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतील. त्यातून व्यावसायिकालाही चांगले उत्पन्न मिळेल. शिवाय, सरकारला महसूल देखील प्राप्त होईल.

  • संदीप काटे, राष्ट्रवादी कार्यकर्ते, पिंपरी-चिंचवड