मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक नियंत्रणासाठी नवी व्यवस्था

0

पुणे ः मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी येत्या काही आठवड्यात ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राज्य महामार्ग पोलिस आणि सेव्ह लाईफ फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प आखण्यात आला आहे. येत्या सहा ते आठ आठवड्यात ड्रोन उपलब्ध होणार असून, त्यानंतर ते कार्यरत होतील. 2021 पर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अपघात न होणारे क्षेत्र म्हणून विकसित करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणार्‍या मार्गिकेवर 30 ते 40 किलोमीटरवर दोन ड्रोन सर्वात आधी वापरात आणले जाणार आहेत. 2016 पासून या मार्गिकेवर सर्वाधिक अपघात झाले आहेत. हे अपघातप्रवण क्षेत्र असल्यामुळे तिथे ड्रोनचा वापर केला जाईल.

वाहनचालकांना मिळणार इशारा….
या संदर्भात सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक पियूष तिवारी म्हणाले, या भागातील मार्गिकेवर पार्क करण्यात आलेल्या गाड्या शोधणे हा महत्त्वाचा भाग असेल. काही प्रवासी द्रुतगती मार्गावर गाड्या थांबवत असल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. द्रुतगती मार्गावर गाडी थांबविण्याला परवानगी नाही. द्रुतगती मार्गावरील गस्त घालणार्‍या पथकाकडून हे ड्रोन नियंत्रित केले जातील. या ड्रोनच्या माध्यमातून गाडी पार्क केलेल्या वाहनचालकांनाही इशारा दिला जाईल. ड्रोनच्या बरोबरच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या भागात इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम आणि ऍडव्हान्स्ड इंटिमेशन सिस्टिम फॉर हॉस्पिटल ही यंत्रणा सुद्धा बसविण्यात येणार आहे.