मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर फास्टॅगच्या वसुलीला स्थगिती द्या

0

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेची मागणी

पिंपरी ः पुणे – मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर फास्टॅग यंत्रणेत त्रुटी असून, त्यामुळे वाहनचालकांची लूट होत असल्यामुळे तेथे वसुलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेने एका निवेदनाद्वारे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे. संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘फास्टॅग सक्ती करण्यात आल्यावर द्रुतगती मार्गावरील यंत्रणेत त्रुटी निर्माण झाल्या आहेत. तेथे निर्धारित रकमेपेक्षा जास्त रक्कम वसूल केली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांची लूट होत आहे. तसेच राज्यातील अनेक टोल नाक्यांवर 24 तासांत परतीच्या प्रवासावर टोल रकमेत 50 टक्के सवलत दिली जाते. मात्र, येथेही टोल रकमेत सवलत मिळावी, अशी मागणीही संघटनेतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, या बाबत द्रुतगती मार्गावरील प्रशासकीय कार्यालयात विचारणा केली असता प्रतिसाद मिळत नाही, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.