मुख्यमंत्रीपदाचा शब्द शिवसेनेला दिला नव्हता; महाराष्ट्राबद्दल अमित शहांचे प्रथमच वक्तव्य !

0

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष अतिशय टोकाला पोहोचले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर केंद्रीय गृहमंत्री भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी प्रथमच भाष्य केले आहे. मुख्यमंत्री पदावरील शिवसेनेचा दावा अमान्य असल्याचे त्यांनी सांगितले. ५०-५० चा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता असे अमित शहांनी सांगितले.

राष्ट्रपती राजवटीवरून महाराष्ट्रातील विरोधक राजकारण करत आहे असा टीका देखील अमित शहांनी केली. ज्यांना सरकार बनवायचे आहे त्यांना आता ६ महिन्याचा कालावधी आहे, त्यांनी बनवावे असेही अमित शहांनी सांगितले.

युतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस होतील असे अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी स्वत:, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यावेळी शिवसेनेने आक्षेप का नाही घेतला असा प्रश्न देखील अमित शहांनी केला. मान्य न होणाऱ्या अटी शिवसेनेने निवडणुकीनंतर ठेवले त्यामुळे त्या मान्य झाल्या नाही असे शहांनी सांगितले.

शिवसेनेने राज्यपालांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबत देखील त्यांनी सेनेला लक्ष केले आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाली नसती तर आमच्यावर जनमत नसताना सरकार चालविल्याचे आरोप केले असते, राज्यपालांनी योग्य निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी बालीसपणाचे वक्तव्य केले आहे असे अमित शहांनी सांगितले.