मुलगा भाजपचा उमेदवार आणि विखे-पाटील कॉंग्रेसचे स्टार प्रचारक !

0

नवी दिल्ली: विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ.सुजय पाटील यांनी भाजपात प्रवेश करून भाजपचे तिकीट मिळविले आहे. त्यामुळे मुलगा भाजपात तर वडील काँग्रसमध्ये अशी स्थिती झाली आहे, असे असतांना आता काँग्रेसने महाराष्ट्रातील स्टार प्रचारक म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे विखे-पाटील यांची गोची झाली आहे, नगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असे विखे-पाटील यांनी सांगितले होते. आता ते राष्ट्रवादीचा प्रचार करणार की नाही? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. तर प्रियांका गांधी यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी त्या महाराष्ट्रात प्रचार करणार असल्याचे काँग्रेसच्या यादीवरून स्पष्ट झाले आहे.

मुलगा भाजपचा उमेदवार आणि विखे-पाटील कॉंग्रेसचे स्टार प्रचारक ! 1

काँग्रेसने आज महाराष्ट्रातील ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियांका गांधी, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार, भाई जगताप, विलास मुत्तेमवार, राजीव सातव, मिलिंद देवरा, संजय निरुपम, नगमा, हर्षवर्धन पाटील, कुमार केतकर, कृपाशंकर सिंह, शिवराज पाटील, नितीन राऊत, वसंत पुरके, चंद्रकांत हंडोरे, भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, नसीम खान, मोहम्मद अझरुद्दीन, मुझफ्फर हुसेन, विश्वजीत कदम, सचिन सावंत, अमर राजूरकर, हरिभाऊ राठोड आणि अमिता चव्हाण यांचा समावेश आहे. मात्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुंबई अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदूरकर आणि गेली वर्षभर राज्यभर फिरून युथ काँग्रेसला वाढवण्याचं काम करणारे सत्यजित तांबे यांचं या यादीत नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.