मेडीकल दुकान फोडणार्‍या अट्टल चोरट्यास अटक

0

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

जळगाव : भडगाव तालुक्यातील मेडिकल दुकान फोडणार्‍या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. मिथुनसिंग मायासिंग बावरी (28,रा.कजगाव ता.भडगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सात हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे विनायक काशीनाथ कोतकर यांच्या मालकीचे राजेश मेडीकल व जनरल स्टोअर्स असे दुकान आहे. 20 जुलै 2019 रोजी रोजी कोतकर यांनी रात्री 1 वाजेच्या सुमारास दुकान बंद केले. त्यानंतर दुसरे दिवशी सकाळी त्यांचा मुलगा महेश हा सकाळी 8 वाजेच्या सुमारास दुकान उघडणे करीता गेला असता त्यास दुकानाचे शटरचे कुलुप तुटलेले व उघडे दिसले. दुकानातील मोबाईल व इतर वस्तू असा एकुण 22 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी झाल्याचे उघड झाले.

मौजमस्तीमुळे संशयिताचे फुटले बिंग

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांच्या पथकातील हवालदार विजय पाटील, अनिल इंगळे, संतोष मायकल, रमेश चौधरी, नरेंद्र वारुळे, अशोक पाटील, किरण चौधरी यांनी केलेल्या चौकशीतून मिथूनसिंग बावरी हा निष्पन्न झाला. चोरीच्या पैशात मौजमस्ती करीत असल्याचे हे बींग फुटले. मिळालेल्या माहितीची पडताळणी करुन पथकाने त्यास ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबुल केले व चोरी केलेल्या मालापैकी 7 हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्याकडून जिल्हयातील दुकान चोरी व घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.