मेहतर समाजाच्या मागण्यांबाबत दखल घेणार ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

0 3

भुसावळात नगरसेविका सोनी बारसेंसह शिष्टमंडळाचे निवेदन ; मेळाव्यात विविध प्रश्‍नांवर चर्चा

भुसावळ- मेहतर, वाल्मिकी, सुदर्शन मागासवर्गीय सफाई कर्मचारी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मेहतर समाजाच्या नगरसेविका सोनी बारसे यांच्या पुढाकाराने गुरुवारी शहरातील टीव्ही टॉवर मैदानावर राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनात हजारो समाजबांधवांनी हजेरी लावली तर मान्यवरांनी विविध प्रश्‍नांवर या अधिवेशनात चर्चा केली. मेहतर समाजाच्या मागण्यांबाबत नगरसेविका सोनी बारसे, माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मागण्या या मानवतेच्या दृष्टिकोनातून बघून सकारात्मक निर्णय घेऊ, असे शिष्टमंडळाला आश्‍वासन दिले.

मेळाव्याला यांनी दिली उपस्थिती
माजी मंत्री एकनाथराव खडसे, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू जी.पवार, चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील, भुसावळचे आमदार संजय सावकारे, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, पारोळ्याचे करण पवार, नगरसेवक पिंटू कोठारी, युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, किरण कोलते, मनोहर बारसे, कौसल्याबाई मोहन बारसे, पिंटू ठाकुर, प्रमोद सावकारे आदींची मेळाव्यात उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
नगरसेविका सोनी बारसे व माजी नगरसेवक संतोष बारसे, राजू खरारे यांनी मुख्यमंत्र्यांना डी.एस.ग्राऊंडवरील सभेत मागण्यांबाबत निवेदन दिले. वाल्मीकी समाज हा स्वच्छतेशी निगडित असल्याने याचवेळी पाल्यांना शाळेत पाठवावे लागते व ते याकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे ते शैक्षणिकदृष्ट्या मागे पडतात, सफाई कामगार राजकीयदृष्ट्यादेखील याच शिक्षणामुळे मागे पडतो. त्याला एकमेव कारण म्हणजे शिक्षण आहे. सर्व आरोग्याच्या संबंधित कामे ही समाजाच्या तरुणांनाच देण्यात यावी तसेच आरोग्यदूत म्हणून सैनिकांप्रमाणे सन्मान मिळावा, कर्मचार्‍यांच्या पाल्यांना वारसा हक्काने नोकरी मिळावी. मेहतर, वाल्मीक, सुदर्शन विकास महामंडळ स्थापन करावे. शालेय संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण तसेच शासकीय नोकरीमध्ये एक ते चार वर्ग या पदासाठी आरक्षण असावे. पंतप्रधान योजनेत घरकुल मिळावीत, प्रचलित ठेका पद्धत करून समाजाच्या बेरोजगार तरुणांना नोकरी द्यावी, औद्योगिक क्षेत्रात प्रत्येक जिल्ह्यात उद्योगासाठी पाच एकर जमीन स्वतंत्र सफाई कर्मचार्‍यांसाठी असावी., आकृतीबद्ध आराखडा रद्द करावा व घरे त्यांच्या नावे करावी, पोलिस विभागांमध्ये समाजाच्या तरुणांना हे आरक्षण देवून समाविष्ट करण्यात यावे, भुयारी गटारी व चेंबरमध्ये काम करताना मृत्यू आल्यास त्यांच्या नातेवाईकांना पुरेशी रक्कम देवून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. दरम्यान, समाजाचे अधिवेशन यशस्वीतेसाठी नगरसेविका सोनी बारसे, संतोष बारसे, मेहतर समाज के सकल पंच, नवयुवक एवं पहेलवान पुत्र ग्रुपच्या सदस्यांसह समाजबांधवांनी परीश्रम घेतले.