मोदींकडून ईद निमित्त मुस्लीम विद्यार्थ्यांना मोठी भेट; शिष्यवृत्ती देणार

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने ईदच्या निमित्ताने मुस्लिम विद्यार्थ्यांना मोठी भेट दिली आहे. प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतली, त्यानंतर मुस्लिम समुदायातील 5 कोटी मुस्लिमांना प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून देण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत लाभ मिळण्याची प्रक्रिया आणखी सुलभ आणि पारदर्शी करण्यात आली आहे.

मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पढो-बढो हे अभियान चालवले जाणार आहे. शिक्षणासाठी मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून प्रसार करण्यात येणार असून, देशभर हे अभियान चालवले जाणार असल्याचे मुख्तार नक्वी यांनी सांगितले. रोजगारासाठी आम्ही रोडमॅप तयार केलेला आहे. शिल्पकार, कारागिरांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न चालवणार आहे. तसेच त्यांना स्वदेशी उत्पादनं ऑनलाइन पद्धतीनं कशी विकता येतील, याचंही प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पाच वर्षांत 25 लाख तरुणांना रोजगारपूरक कौशल्य प्रधान करण्यात येणार आहे. शिका आणि कमवा, गरीब तरुणांना कौशल्य विकास अशा योजनांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचेही नक्वी यांनी सांगितले.