मोशी-चिंबळीतील बंधार्‍याला जलपर्णीचा धोका

0

तात्काळ हटविण्याची नागरिकांची मागणी

चिंबळी –इंद्रायणी नदी पात्रात गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदिला पूर आल्याने पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतील जलपर्णी पुराच्या पाण्याबरोबर वाहुन आली आहे. ही जलपर्णी पालिका हद्दीतील मोशी-चिंबळी हदीत असलेल्या इद्रायंणी नदीच्या बंधार्‍याला अडकली आहे. अडकलेली जलपर्णी किरकोळ नसून तब्बल हजारो टनाच्या आसपास असल्याने त्याचा नदिवरील सिमेंट बंधार्‍याला धोका निर्माण झाला आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यास जलपर्णीचा दबाव निर्माण होऊन सिमेंट बंधार्‍याला तडे जावु शकतात. तडे गेल्याने बंधारा तुटण्याची शक्यताही नाकरता येत नाही अशी भिती जाणकार व्यक्त करत आहेत. तळवडेपासून ते मोशी घाटापर्यंतची अंदाजे दहा किलोमीटर नदी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतुन वाहते.

बंधार्‍याचा सुरक्षेचा प्रश्‍न
या हद्दी अंतर्गत आलेली जलपर्णी पावसाळ्या पूर्वीच पालिकेच्यावतीने हटविण्याचे काम सुरु होते. इंद्रायणीला पूर आल्याने पाण्याबरोबर जलपर्णी वाहून मोशी-चिंबळी बंधारा हद्दीत आली होती. त्यामुळे मोशी ते तळवडे नदी पात्र जलपर्णी मुक्त झाले होते. तर बंधारा हद्दीत काही टन जलपर्णी साचली आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात या जलपर्णीमध्ये भर पडली आहे. पाण्याऐवजी जलपर्णीचा ढिग अडकून राहिल्याने बंधार्‍याच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न उपस्थित राहतो आहे. सतत आठ दिवस पडत असलेल्या पावसामुळे इंद्रायणीला पूर आल्याने मोशी घाटावरची जलपर्णी संपूर्ण खाली वाहून आली. सरळमार्गी पुढे न सरकता आल्हाटवाडी येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यावर अडकून पडली आहे. यामुळे बंधार्‍याला धोका निर्माण झाला असल्याचे पाहणीत दिसून येत आहे. येथे जलपर्णी पात्राबाहेर काढण्याचे काम सुरु असले तरी मनुष्यबळा अभावी काम संथ गतीने सुरु आहे. तरी संभाव्य धोका ओळखून पालिकेने तात्काळ ही जलपर्णी काढून टाकावी अशी मागणी नागरिकरांमधून होत आहे.