… म्हणून मुस्लीम कुटुंबाने पोलिसाच्या नावावर ठेवले मुलाचे नाव रणविजय खान!

0

लखनऊ – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्येही विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद खायला मिळत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र कठोर मानल्या जाणार्‍या पोलिसांची एक ह्दयस्पर्षी कामगिरी समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या एका मुस्लिम गर्भवती महिलेला पोलिसांनी केलेली मदत इतकी भावली की त्यांनी त्यांच्या नवजात मुलाचे नाव पोलीस अधिकार्‍याच्या नावावर रणविजय खान असे ठेवले आहे.

तमन्ना आणि तिचा पती अनीस खान लखनऊ येथे राहतात. तमन्नाचे पती अनीस खान काही कामानिमित्त १० दिवसांपूर्वी नोएडा येथे गेले होते. ते पुन्हा परतणार होते इतक्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. दुसरीकडे तमन्ना गरोदर होती. अनीस नोएडावरुन परतू शकत नव्हता. बुधवारी तमन्नाने सोशल मीडियावर तिची समस्या व्हिडीओच्या माध्यमात शेअर केली. व्हिडीओ बरेली येथील पोलीस अधिक्षक यांच्याकडे पोहचला. त्यांनी तातडीने नोएडा येथील एडीसीपी कुमार रणविजय सिंह यांना या प्रकरणी मदत करण्यास सांगितले. रणविजय यांनी तातडीने रात्री ११ वाजता अनीसला बरेली पाठवण्यासाठी गाडीची व्यवस्था केली. इथवरच न थांबता रात्रीच्या अडीच वाजता रणविजय बरेलीला पोहचले. तोपर्यंत लोकांच्या मदतीने तमन्नाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. विशेष म्हणजे वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या मदतीने भारावलेल्या या मुस्लिम दाम्पत्याने त्यांच्या नवजात मुलाचं नाव रणविजय खान असे ठेवले आहे.