‘या’ दोन गोष्टींसाठी फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंचे कौतुक !

0

मुंबई: राष्ट्रवादी, कॉंग्रेसशी आघाडी केल्यानंतर भाजपकडून वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर भाजपकडून टीका होत असताना माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे आणि सीएए या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परखड भूमिका घेतली. या दोन बाबींसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन करतो असे विधान फडणवीस यांनी केले आहे. भीमा कोरेगाव आणि एल्गार हे वेगळे नाही, हेच आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. तपासाची व्याप्ती आता वाढली असल्याने तो केंद्र सरकारकडे जाणेच योग्य आहे. तसेच जनगणनेचा कायदा कठोर आहे. प्रश्नावली ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.

मुस्लीम मतांसाठी देशात स्पर्धा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिरासाठी सरकारने ट्रस्ट तयार केले आहे मात्र मश्जीदसाठी काहीही केलेले नाही असे सांगत केंद्र सरकारवर टीका केली होती. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. तर मुस्लिम समाजाचे सर्व स्थळ हे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येतात, हेही त्यांना ठावूक आहे. तेथे ट्रस्ट नसतो असे सांगत सद्या मुस्लीम मतांसाठी देशात स्पर्धा सुरू आहे असा टोला राष्ट्रवादीला लगावला आहे.

सरपंच निवडीवरून सरकारवर हल्लाबोल
थेट निवडणूक असली की सरकारचा हस्तक्षेप कमी असतो. त्यामुळेच त्या रद्द करण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे. सरपंच निवडणूक थेट घेण्याचा निर्णय आम्ही सुद्धा सरपंच परिषदेच्या शिफारसीवर घेतला होता असं सांगत थेट सरपंच निवड रद्द करण्याचा निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे.

कर्जमाफीवरुन सरकारला धारेवर धरणार
कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू, कर्जमाफी नाही आणि मुक्तीही नाही, जाहीर नाम्यातील एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, आतापर्यंत नव्या सरकारला सूर गवसलेला नाही. आतापर्यंतचं हे सर्वात गोंधळलेलं सरकार आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका करत येणाऱ्या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी विषयावरुन राज्य सरकारला कोडींत पकडण्याची तयारी केल्याचं दिसून येत आहे.