रणजीत बच्चन यांच्या हत्येमागे पत्नीचा प्रियकर; धक्कादायक खुलासा !

0

लखनऊ: विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची लखनऊ येथे आठवड्याभरापूर्वी मॉर्निंग वॉकला जाताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा झाला आहे. रणजीत बच्चन हे आपली दुसरी पत्नी स्मृती श्रीवास्तव हीला घटस्फोट देण्यास विलंब करीत असल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी रणजीत बच्चन यांची पत्नी, तिचा प्रियकर दीपेंद्र आणि बच्चन यांचा ड्रायव्हर संजीत गौतमला अटक केली आहे. तसेच ज्या व्यक्तीने बच्चन यांची गोळ्या घालून हत्या केली त्या व्यक्तीला युपी पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. बच्चन आणि तिच्यामध्ये होणाऱ्या घटस्फोटाचे प्रकरण २०१६ पासून कोर्टात प्रलंबित होते. दरम्यान, वारंवार कोर्टात गैरहजर राहून बच्चन घटस्फोटाची प्रक्रिया लांबवित होते. दीपेंद्रसोबत आपल्या लग्नासाठी ते अडथळा निर्माण करीत होते, असा आरोप तिने केला आहे.

लखनऊच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, रणजीत बच्चन यांना दोन बायका आहेत. त्यांची दुसरी पत्नी ही सरकारी नोकरीत आहे. त्याचबरोबर, रणजीत यांच्यावर चार विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून यामध्ये बलात्कार प्रकरणाच्या गुन्ह्याचाही समावेश आहे.