रहिवास क्षेत्राचा वाणिज्य वापर ; पोदार शाळेला साडे अकरा लाखांच्या दंडाची नोटीस

0

दंड न भरल्यास शाळा होणार सील

जळगाव – शहरातील महामार्गालगत असलेल्या रहिवास क्षेत्राचा पोदार शाळेसाठी वाणिज्य वापर करुन शर्तभंग केल्याप्रकरणी महसूल प्रशासनातर्फे गुरुवारी साडे अकरा लाखाच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. दंड न भरल्यास शाळा सील करण्याचीही कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

रहिवास क्षेत्र म्हणून प्रयोजन दाखविणार्‍या मिळकत धारकांकडून मिळकतीचा व्यावसायिक वापर होत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. जळगाव उपविभागातर्फे यापूर्वी शहरातील काही डॉक्टरांनी रहिवास क्षेत्राचा व्यावसायिक वापर केला म्हणून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मार्च अखेरच्या पार्श्‍वभूमिवर महसूल वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून थकबाकीदारांना नोटीस बजाविण्याचे काम सुरु आहे. पिंप्राळा शिवारात येणार्‍या पोदार इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलने रहिवास क्षेत्राचे प्रयोजन असतानाही त्याचा व्यावसायिक वापर केला. गेल्या दहा वर्षापासून हा वापर होत असून या संदर्भात प्रशासनाकडून कार्यवाही सुरु होती. गत दहा वर्षात शर्तभंग करीत जवळपास साडे अकरा लाख रुपयांची थकबाकी पोदार शाळेने थकविली आहे. या थकबाकीप्रकरणी गुरूवारी पोदार शाळेला साडे अकरा लाख रुपयांचा दंड भरण्याची नोटीस महसूल प्रशासनाकडून बजाविण्यात आली आहे. तसेच दंड न भरल्यास प्रशासनाकडून शाळा सील करण्याचीही कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यासोबतच पिंप्राळा शिवारातील दहा हॉटेल व्यावसायिकांना देखील अशाच आशयाच्या नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.