राजकीय हवा बदलत आहे; नागपूर जि.प.च्या निकालावरून भुजबळांचे भाजपला टोला !

0

मुंबई: नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होतील. या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य सरकारमधील अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालांवरून भाजपाला टोला लगावला आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालावरून हवा बदलत आहे, असे दिसत आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.

नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५८ जि.प.सर्कल पैकी २८ सर्कलचे निकाल जाहीर झाले आहेत. यात २३ जागावर कॉँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने विजय मिळविला आहे. यात कॉँग्रेसने १९ तर राष्ट्रवादीने चार जागावर विजय मिळविला आहे. भाजप चार जागावर विजयी झाली आहे तर एका जागेवर शेकापला विजय मिळाला आहे.नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली होती. यात कॉँग्रेसने ४२ तर राष्ट्रवादीने १६ जागेवर निवडणूक लढविली होती.