औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याच्या ठाकरे सरकारच्या हालचाली !

0

औरंगाबाद : गेल्या काही वर्षापासून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी होत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या मागणीने जोर धरला होता. तसेच मनसे कडून राज्यात काही ठिकाणी औरंगाबाद जाणाऱ्या एसटी बसवर संभाजीनगर नावाची पाटी लावण्यात आली होती. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहराचे नामांतर करण्याच्या हालचाली राज्यातील ठाकरे सरकारकडून सुरु झाल्या आहेत.

नामांतर करण्यासाठी महापालिकेतील झालेले ठराव, न्यायालयात प्रलंबित प्रकरणे या संदर्भातला सविस्तर अहवाल राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या संदर्भामध्ये माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. महापालिकेने जून १९९५ मध्ये नामांतराचा ठराव मंजूर करुन शासनाकडे पाठवला होता. शासनाने नोव्हेंबर १९९५ मध्ये संभाजीनगरचे अधिसूचना प्रसिद्ध केली होती.

अधिसूचना झाल्यानंतर मुस्ताक अहमद यांनी उच्च न्यायालयात याचिकेला आव्हान दिले होते. त्यानंतर २००१ साली विलासराव देशमुख यांच्या सरकारने राज्य शासनाची अधिसूचना मागे घेतली. नामकरण करण्याबाबत केंद्रीय मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार आवश्यक ती परिपूर्ती करून सविस्तर प्रस्ताव तयार करणे, पूर्वीच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करणे, न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका सद्यस्थितीची माहिती एकत्र करणे, रेल्वे आणि पोस्ट खाते यांचे ना हरकत प्रमाणपत्र कागदपत्र जमा करणे याचं काम सुरू आहे.