राज्यातही खांदेपालट!

0

औरंगाबाद/मुंबई : राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत. परंतु, आता या वृत्ताला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होईल, असे सूतोवाच फडणवीस यांनी औरंगाबाद येथे केले. मराठवाड्यात लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येणार असून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबदा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री रविवारी उपस्थित होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र डागत रविवारी काँग्रेस नेते नारायण राणे यांनीही नवरात्रात राजकीय भूकंप घडवून आणण्याचे संकेत दिले. तसेच दसर्‍यापूर्वी सीम्मोलंघन करणार असल्याचा सूचक इशाराही दिला आहे. एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत नारायण राणे यांनी हे संकेत दिल्याने राज्यात लवकरच मोठी राजकीय उलथापालथ होणार हे स्पष्ट झाले आहे.

काही नवीन चेहर्‍यांना संधी
मराठवड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यासाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाकडून औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील प्रश्नांबाबत विविध क्षेत्रातील नागरिकांना भेटून आढावा घेण्यात आला होता. रविवारी मुख्यमंत्र्यांनी लवकरच बैठक होणार असल्याचे सांगितले. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पावलावर पाऊल टाकत हा विस्तार होणार आहे. प्रत्येक मंत्र्याचे काम पाहून बदल करण्यात येणार आहेत. यासाठी मंत्र्यांना एक प्रश्नावली देण्यात आली आहे. या विस्तारात काही खाते बदल, तर काही नवीन चेहर्‍यांना संधी मिळण्याची आशा आहे. मात्र, विस्तार नेमका कधी होणार याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही.

सिंधुदूर्ग काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त
एकीकडे नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच शनिवारी काँग्रेसने सिंधुदूर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्त्वाखालील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आणि राणेंना धक्का दिला. यावरून आक्रमक पवित्रा घेतलेल्या नारायण राणे यांनी अशोक चव्हाण हे कुरघोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर काँग्रेसचे अस्तित्व जेवढे कोकणात आहे, तेवढे नांदेडात नाही. नांदेडमध्ये काँग्रेस संपवणारे राज्य कसे काय सांभाळू शकणार? अशी टीकाही राणे यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली आहे.

राणेंचे षडयंत्र उघड
राणे यांनी सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सर्व सदस्यांचा स्वतंत्र गट करून तशी नोंदणी करून घेतली होती जेणेकरून काँग्रेसचे आदेश पाळण्याचे बंधन या सदस्यांवर राहणार नाही व राणे यांचाच पकड राहिल. परंतु, काँग्रेस नेत्यांच्या हे लक्षात येताच व राणेंच्या हालचाली वाढल्याने सिंधुदूर्ग काँग्रेस कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली. व कार्यकारिणीवर राणेविरोधकांना स्थान देण्यात आले. यामुळे राणे भडकले आहेत. सिंधुदूर्गमधील कार्यकारिणी बदलताना काँग्रेसने मला काहीही विचारले नाही. यापूर्वी मला कोणतीही माहिती न देता कार्यकारिणी रद्द केली आहे. पक्षाच्या कृतीमागे मोहन प्रकाश आणि अशोक चव्हाण आहेत. या दोघांच्या षडयंत्रामुळे काँग्रेस संपविण्याचे काम सुरू आहे, असाही आरोप राणेंनी केला आहे.

पंतप्रधान मोदींना राणेंच्या शुभेच्छा!
महाराष्ट्रात जो माणूस यशस्वी होईल, ज्याला जनता निवडून देते त्याला संपविण्याचे काम काँग्रेसकडून होते आहे. जे लोक काँग्रेसला संपवू पाहात आहेत त्यांना मी त्यांची जागा दाखवून देईन. मी काँग्रेसमध्ये आल्यापासून अशोक चव्हाण आणि मोहन प्रकाश यांना मी नकोय म्हणून ते षडयंत्र करत आहेत. अशोक चव्हाणांनी महाराष्ट्रात काँग्रेस संपविण्याचे काम हाती घेतले आहे. काँग्रेस सत्तेवर कशी जाईल हे पाहण्यासाठी मी प्रयत्न केले, मात्र कुरघोडी करणारी मंडळी तेव्हा कुठे होती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 2005 मध्ये मी काँग्रेसमध्ये आलो. देशपातळीवर काम करायला मिळेल असे वाटले होते. पण माझी सपशेल निराशा झाली. मला देण्यात आलेले एकही आश्वासन काँग्रेसने आजवर पाळलेले नाही. राणेंनी या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. तसेच ते यशस्वी पंतप्रधान ठरावेत, असेही ते म्हणाले.