Wednesday , December 19 2018
Breaking News

राज्यात इलेक्ट्रिक उद्योगांसाठी मोठी संधी

मुंबई । देशाने वाहनांसाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले असून, यासाठी महाराष्ट्राने इलेक्ट्रिक वाहन धोरण लागू केल्याने राज्यात उद्योगांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे, असे मत ’इमरजिंग टेक्नॉलॉजी इन सेक्टर्स’ या चर्चा सत्रात सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले. बीकेसी येथे एमएमआरडीए मैदानावरील मॅग्नेटिक महाराष्ट्र कॅन्व्हर्जन्स 2018 या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेमध्ये इमर्जिंग टेक्नॉलॉजी इन सेक्टर्स हा परिसंवाद झाला. यावेळी महिंद्रा आणि महिंद्रा उद्योगाचे कार्यकारी संचालक डॉ. पवन गोयंका, कानपूर आयआयटीचे प्रा. सिद्धार्थ पांडा, टाटा पॉवर आणि सोलर सिस्टिम्सचे आशिष खन्ना, सीआयआयचे सुमीत सिन्हा, हिंदुजा सिस्टिम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल माहेश्‍वरी, एनडीटीव्हीच्या पर्यावरण रिपोर्टर गार्गी रावत यांनी सहभाग घेतला.

गुंतवणुकीसाठी पुढे यावे
याप्रसंगी खन्ना म्हणाले, सौरऊर्जा उत्पादनात 80 ते 100 गिगा वॉट क्षमतेने वाढ होत असून, जागतिक स्थिती पाहता यामध्ये 748 गिगा वॉट क्षमता वाढीची गरज आहे. यामध्ये असणारे अडथळे कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू असून पर्यावरण, आरोग्य आदींचा विचार करता ऊर्जेचा हा स्रोत दुर्लक्षित करता येणे शक्य नाही. फ्लेक्झिबल इलेक्ट्रॉनिक्समधील संधींचा वेध घेताना आयआयटीचे प्रा. पांडा यांनी उद्योजकांनी यामध्ये गुंतवणुकीसाठी पुढे येण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, इलेक्टॉनिक्स मटेरिअल वापराची व्याख्या यामुळे बदलते आहे. पारंपरिक पद्धतीऐवजी पॉलिमर्ससारख्या मूलभूत मटेरियलचा येथे वापर होणार असून, त्याचा वापर सेन्सर्सच्या सूक्ष्म उत्पादनामध्ये होऊन किंमत, ऊर्जा वापर यामध्ये यामुळे क्रांती दिसून येईल.

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणे गरजेचे
डॉ. गोयंका म्हणाले, प्रदूषण रोखणे, पारंपरिक इंधनाचा वापर कमी करणे आदींसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने यासाठी पावले उचलताना राज्यांनी यासाठी कायदे व नियमांमध्ये सुधारणा कराव्यात यासाठी आवश्यक उद्योग, वाहने आदी धोरण बनवण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कार्यवाही महत्त्वपूर्ण ठरली आहे. राज्याने मागच्या आठवड्यात धोरण घोषित केले आहे. यामुळे या क्षेत्रातील वाटचालीची रूपरेखा सर्वांसमोर आली आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर या क्षेत्रात असलेली स्पर्धा पाहता यातील देशाच्या प्रगतीसाठी जगाच्या नकाशावर वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणारे ठरेल. चीनने आठ वर्षांपूर्वी या गोष्टीला प्राधान्य देऊन आपल्या क्षमता वाढीसाठी पावले टाकली आहेत, असे डॉ. गोयंका म्हणाले.

शासनाचे धोरण पूरक ठरणार
सिन्हा यांनी नवीकरणीय ऊर्जा वापरामुळे बदलणारे तंत्राचे फायदे त्यातील मर्यादा विशद करताना यामुळे संशोधनाच्या संधी महत्त्वपूर्ण आहेत असे सांगितले. ते म्हणाले, इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरीच्या वापरामुळे या क्षेत्रातील मागणी मोठ्या प्रमाणात आहे. याला शासनाचे धोरण पूरक ठरणार आहे. या संधींचा वेध घेतला जावा. कपिल माहेश्‍वरी यांनी सौरउर्जा उत्पादनासाठी भौगालिक क्षेत्राची गरज असून त्यासाठी रहिवासी क्षेत्रातील रुफटॉप संकल्पना हा कळीचा मुद्दा ठरून त्याचा आर्थिक परिणाम नागरिकांना लाभदायक ठरू शकतो. यासाठी सर्व स्तरापर्यंत जनजागृती व्हावी, असे त्यांनी सांगितले.

About admin

हे देखील वाचा

कामगार हॉस्पिटल दुर्घटना: गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी

मुंबई – अंधेरी पूर्व येथील कामगार हॉस्पिटलमध्ये काल घडलेल्या आग दुर्घटनेनंतर आज दुपारी गृहराज्यमंत्री रणजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!