राज्यावर राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ देणार नाही: राष्ट्रवादी

0

मुंबईः मुख्यमंत्री पदावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याने निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा उलटल्यानंतर देखील सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या दिशेने वातावरण गेले आहे. परंतु ‘राज्यावर राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ देणार नाही’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. ‘शिवसेनेने ठरवल्यास राज्याला पर्यायी सरकार देऊ शकतो’, असे मलिक यांनी म्हटले आहे. दरम्यान, शरद पवार आज मुंबईत आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. यानंतर पवार उद्या किंवा परवा पुन्हा दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे सतत भाजपवर हल्ला करत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल, अशी आशा व्यक्त केली. पण त्यांनी शिवसेना किंवा युतीचा उल्लेख न केल्याने राज्यातील राजकीय अस्थिरता कायम आहे.